तेर : संत गोरोबा काकांची जीवनगाथा असलेला चरित्र ग्रंथ , ‘ वैराग्य महामेरू संत श्री गोरोबा काका ‘ आज गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर गोरोबा काकांच्या समाधी स्थानी त्यांच्या चरणी अर्पण करण्यात आला . या ग्रंथाचे लेखक , संत वाङ्मयाचे अभ्यासक व कथा प्रवक्ते तथा संत चरित्र निरूपणकार श्री दीपक महाराज आणि या ग्रंथाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे योगदान असलेले , श्रीराम हॉस्पिटल मुरुडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश रणदिवे यांच्या हस्ते सदरील ग्रंथ गोरोबाकाकांच्या समाधीस अर्पण करण्यात आला . याप्रसंगी कला शिक्षक नवनाथ पांचाळ , लातूर येथील युवा सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ चिरे , ह.भ.प.अविनाश तपिसे इत्यादींची उपस्थिती होती .
संत परीक्षक श्री गोरोबाकाकांचे हे जीवन चरित्र समग्र प्रकाशन यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आले असून या पुस्तकामध्ये कवी राजेंद्र अत्रे , धाराशिव व नवनाथ पांचाळ , तेर यांची रेखाटने टाकण्यात आली आहेत . पुस्तकाचे मुखपृष्ठ फोर्टीफाय कम्युनिकेशन मुंबई यांनी तयार केले असून मुद्रण व्यवस्था शिवानी प्रिंटर्स पुणे यांनी पाहिली आहे . अक्षर जुळणीचे काम श्री नेताजी जावीर आणि पुस्तकातील छायाचित्रे राज फोटो स्टुडिओ यांच्या वतीने देण्यात आली आहेत . या पुस्तकामध्ये 80 GSM चा कागद वापरण्यात आला असून , 130 GSM च्या आर्ट पेपरवर 12 पृष्ठांवरती या विषयाने रंगीत छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत . संत गोरोबाकाकांच्या चरित्र व वाङ्मयाचा प्रसार व प्रचार करण्याच्या हेतूने निर्माण करण्यात आलेला, सुमारे 270 पृष्ठांचा हा ग्रंथ , वाचकांसाठी केवळ 80 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे . परफेक्ट व पुठ्ठा किंवा गॅली बाइंडिंग प्रकारात तयार करण्यात आलेल्या या पुस्तकाचे वितरण लवकरच सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती वैराग्य महामेरू प्रबोधिनीचे प्रसिद्धी प्रमुख यांच्याकडून देण्यात आली आहे .