जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात आज भव्य क्रिकेट स्टेडीअमचे उद्धाटन करण्यात आले. भारतीय वनडे क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या हस्ते या स्टेडिअमचे उद्धाटन झाले. कर्जत तालुक्यातील राशीन येथे सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान, रोहित शर्माचे आगमन झाले. त्यानंतर भव्यदिव्य पद्धतीने त्याचे स्वागत करण्यात आले. कर्जत व जामखेड मध्ये अजून एक एक स्टेडिअम उभारणार असल्याची माहिती आ. रोहित पवार यांनी दिली.

ग्रामीण भागातील मुलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या हेतूने या क्रिकेट अकादमीची निर्मिती झाल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. यामुळे ग्रामीण भागातील मुलांना खेळाची आवड निर्माण होणार असल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. आपण स्वतः रोहित शर्माचे फॅन असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. रयत शिक्षण संस्थेची 25 एकर जागा असून त्यामध्ये रणजी क्रिकेट मॅच होईल अशी व्यवस्था होणार आहे. या क्रीडा संकुलामध्ये कुस्तीसाठी इनडोअर हॉल बनवले जाणार आहेत, सामाजिक दायित्व निधीतून हा प्रकल्प उभारला जाणार आहे, येथे सर्व मोफत प्रशिक्षण घेता येणार आहे. अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

स्टेडिअमला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव
या अकॅडमीत होतकरू खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. क्रिकेट, कुस्ती आणि उरेलेल्या जागेत शाळा बांधली जाणार आहे. कर्जत- जामखेड मतदारसंघ आणि नगर जिल्ह्यातील मुलांना याचा फायदा होईल, असेही पवार यांनी सांगितले. राशीन येथील क्रिकेट स्टेडियमला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आले आहे. प्रवेशद्वारावरच छत्रपती शिवरायांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात आला आहे. तर कर्जत- जामखेड स्टेडियमला तेथील लोकांना विचारून नाव देण्याचं ठरविण्यात येईल, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

कसं काय कर्जतकरांनो, रोहितची मराठी…
रोहित शर्माने उपस्थितांसोबत मराठीतून संवाद साधला. कसं काय कर्जत-जामखेडकरांनो…असं रोहित शर्माने विचारलं. यापुढे रोहित शर्माने मराठीतूनच भाषण केलं. विश्वचषक जिंकल्यानंतर आमच्या जिवात जीव आला, असं विधान रोहित शर्माने केलं. पुढचा यशस्वी जैस्वाल आणि जसप्रीत बुमराह कर्जत-जामखेडमधूनच होणार, असं मोठं विधानही रोहित शर्माने केलं. तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिलं, त्यासाठी धन्यवाद…मी पुन्हा या ठिकाणी येईल, असंही रोहित शर्मा म्हणाला. रोहित पवार यांनी रोहित शर्माला कर्जत-जामखेड येथे येऊन कसं वाटलं?, असा प्रश्न विचारला. यावेळी इकडे येऊन पवित्र वाटलं, असं उत्तर रोहित शर्माने दिलं.