खराब व दलदलीच्या रस्त्यांतून होणार नागरिकांची सुटका : जनतेत आनंदाचे वातावरण
जामखेड प्रतिनिधी
महायुती सरकारने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा 2 (बॅच 1) संशोधन व विकास या योजनेतून कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील एकुण 40 किलोमीटर लांबीच्या 9 रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून या रस्त्यांच्या कामांसाठी महायुती सरकारने सुमारे 51 कोटींचा निधी मंजुर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय ग्रामविकास विभागाने आज 4 रोजी जारी केला आहे, मंजुर झालेली सर्व रस्ते आता सिमेंट कॉक्रीटचे होणार आहेत, अशी माहिती आमदार प्रा राम शिंदे यांनी दिली आहे.
कर्जत – जामखेड मतदारसंघात दळणवळणाच्या सुविधा अधिक गतीमान व्हाव्यात यासाठी आमदार प्रा राम शिंदे हे नेहमीच आग्रही राहिलेले आहेत. ‘गाव तिथे रस्ता, वाडी तिथे रस्ता’ व्हावा, याकरिता आमदार शिंदे हे सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत असतात. आजवर त्यांनी रस्त्यांच्या कामांसाठी करोडो रूपयांचा निधी मतदारसंघात खेचून आणला आहे. त्यामुळे मतदारसंघात रस्त्यांचे मजबुत जाळे निर्माण झाले आहे. मतदारसंघातील काही भागातील रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित होते. रस्ते अतिशय खराब व दलदलीचे होते. या रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार शिंदे यांचा सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. अखेर या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात रस्त्यांचे जाळे मजबुत करण्यासाठी नेहमी सतर्क आणि दक्ष असलेल्या आमदार प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत महायुती सरकारने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 9 महत्वाच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देत सुमारे 51 कोटींचा निधी मंजुर केला आहे. मंजुर झालेले सर्व रस्ते अतिशय खराब झालेले होते. यातील काही रस्ते दलदलीचे होते. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. आता मंजुर झालेल्या रस्त्यांची सर्व कामे सिमेंट कॉक्रीटची होणार असून पुढील 25 वर्षे हे रस्ते खराब होणार नाहीत. आमदार प्रा.राम शिंदे यांनी रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागल्यामुळे जनतेते आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून जामखेड तालुक्यातील जवळा ते गोयकरवाडी या 5 किलोमीटर रस्त्यासाठी 9 कोटी 94 लाख रूपये, प्रजिमा 73 ते जायभायवाडी या साडेतीन किलोमीटर रस्त्यासाठी 4 कोटी रूपये, रामा 408 (दौंडाचीवाडी) ते तरडगाव ते जिल्हा हद्द या 2. 900 किलोमीटर रस्त्यासाठी 3 कोटी 46 लाख रूपये, नायगाव ते सतेवाडी 2.100 किलोमीटर रस्त्यासाठी 2 कोटी 35 लाख रूपये, रामा 409 ते (नान्नज) ते वाघा ते पिंपळगाव उंडा या सात किलोमीटर रस्त्यासाठी 8 कोटी 65 लाख रूपये, रामा 408 ते सांगवी या साडेचार किलोमीटर रस्त्यासाठी 4 कोटी 64 लाख रूपये मंजुर करण्यात आले आहेत.
तसेच कर्जत तालुक्यातील राममा 516 अ (बाभुळगाव खालसा) ते टाकळी खंडेश्वरी या पाच किलोमीटर रस्त्यासाठी 5 कोटी 27 लाख रूपये, राममा 516 अ (मिरजगाव) ते बेलगाव ते शिंदेवस्ती (भाग मिरजगाव ते बेलगाव) या पाऊणे पाच किलोमीटर रस्त्यासाठी 6 कोटी 74 लाख रूपये, प्रजिमा 66 मुळेवाडी ते कौडाने या पाच किलोमीटर रस्त्यासाठी 5 कोटी 54 लाख रूपये मंजुर करण्यात आले आहेत.
चौकट
कर्जत-जामखेड मतदारसंघातील काही प्रमुख रस्ते अतिशय खराब झालेले होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागत होते. सदर रस्त्यांची कामे मार्गी लागावीत यासाठी माझा सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. महायुती सरकारने मतदारसंघातील 9 रस्त्यांच्या कामांसाठी 51 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे. खराब रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासातून आता नागरिकांची सुटका होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच महायुती सरकारने रस्त्यांच्या कामांसाठी भरीव निधी मंजुर केल्याबद्दल मनापासून आभार !
- आमदार प्रा.राम शिंदे,
माजी मंत्री महाराष्ट्र राज्य