जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृति समितीच्या वतीने आमदार राम शिंदे यांचा नागरी सत्कार संपन्न !
जामखेड प्रतिनिधी
मिटींगा घेणाऱ्या विद्यमान आमदाराच्या वकिलांची फौज कुठे गेली ? कुठल्या कोर्टात पिटीशन दाखलय? लोकांची दुकाने घरे उठल्यावर पिटीशन दाखल करणार होतात का ? असा सवाल करत जामखेड शहरातील जनतेवर डीपी प्लॅनच्या आडून होणारा अन्याय अत्याचार दुर करण्यासाठी मी कृति समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो, मला एवढचं कळतं लोकांना काय पाहिजे ते द्यायचं, त्यानुसार हा डीपी प्लॅन रद्द केला, असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्ला चढवला.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या मध्यस्थीने व कृति समितीच्या मागणीनुसार महायुती सरकारने अन्यायकारक विकास आराखडा रद्द केला. सरकारच्या या निर्णयामुळे जामखेड शहरातील व्यापारी व नागरिक तसेच जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृति समिती यांच्या वतीने आमदार प्रा राम शिंदे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार शिंदे बोलत होते.
यावेळी कृति समितीचे अध्यक्ष प्रा मधुकर आबा राळेभात, डाॅ माजी सभापती भगवान मुरूमकर, रविंद्र सुरवसे, अशोक खेडकर, शरद कार्ले, संजय काशिद, पवनराजे राळेभात, अमित चिंतामणी, अमित जाधव, मोहन पवार, बाजीराव गोपाळघरे, राहुल उगले, अकाश बाफना, विनायक राऊत, जमीर बारूद, महालिंग कोरे, सह आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी डिपी प्लॅन रद्द केल्याबद्दल जामखेड शहरातील विविध घटकातील नागरिकांनी व व्यापारी बांधवांनी आमदार राम शिंदे यांचा नागरी सत्कार करत आभार मानले.
यावेळी पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, जामखेड ते सौताडा या रस्त्याचे काम खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमांतून मंजुर झाले.कामही सुरू झाले. पण काम सुरु असतानाच विद्यमान आमदाराने शहरात अनेक मिटींगा घेतल्या. यांची घरे जाणार, त्यांची बिल्डींग पडणार, याचा ओटा जाणार, त्यो मागं सरणार, याचं असचं होणार, त्याच तसचं होणार, अशी भिती अनेकांना दाखवली. पण त्यांना दिलासा देण्यासाठी काहीच केलं नाही. पण मी आमदार झाल्यावर रस्त्याच्या विषयावर मी एकही मिटींग घेतली नाही. मला एक शिष्टमंडळ येऊन भेटलं, त्यांचं म्हणणं ऐकुन घेतलं, त्यांना भिती दाखवत बसलो नाही, तर संबंधित एजन्सीला सांगुन टाकलं, तुला जेवढं सांगितलयं तेवढं करून टाक, जेव्हा केव्हा पुढे प्रश्न निर्माण होईल तेव्हा आम्ही बघून घेऊ, लोकं उठवायचं काम नाही, आम्ही रस्ते बाहेरून काढू, आम्ही इथले आहोत, आम्हाला कळतो काय प्रश्न आहे तो, त्यामुळे कोणाला कसलाच धक्का लागला नाही, रस्त्याचे काम सुरु राहिलं आणि तो प्रश्न मिटला.
मी मंत्री असताना शहर विकास आराखड्याचा विषय पुढे आला नाही. पण तो उशिराने आला म्हणजे माझ्या पराभवानंतर आला. विकास आराखडा कोणाच्या काळात आला? कोणती एजन्सी दिली होती? कोणी हा प्रस्तावित केला ? कोणाच्या वेळोवेळी सुचना मिळाल्या ? विकास आराखडा बनवण्यासाठी बारामतीची एजन्सी कोणी नेमली, राज्यात दुसरी एजन्सी नव्हती का ? मी एजन्सी नेमली म्हणता तर मी बारामतीची एजन्सी कसा नेमेल ? असे म्हणत शिंदे रोहित पवारांकडून सुरु असलेल्या दिशाभूलीचा आणि बनवाबनवीचा जोरदार समाचार घेतला.
डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात विद्यमान आमदाराने अनेक मिटींगा घेतल्या, गावकऱ्यांना म्हणाले वर्गण्या करू नका, आम्ही वकिल देतो, भारी वकिल देतो, बारामतीच्या वकिलांची फौज उभी करू म्हणले, तुम्ही निवडून आलेलेत म्हणून आम्ही तुमची वाट बघितली, आपल्या जामखेड शहरातल्या लोकांचं नुकसान व्हायला लागलयं, आपण जर बघितलं नाही तर आपल्या लोकांचं खूप नुकसान होईल म्हणून मला लक्ष घालावं लागलं, अन्यायकारक विकास आराखडा मंजुर झाला तर आपली सर्वसामान्य माणसं त्यात नाहक भरडली जातील, त्याचं मोठं नुकसान होणार होतं, मग तुम्ही जी फौज उभी करणार होतात ती कुठे गेली ? कोणत्या कोर्टात पिटीशन दाखलयं ? कोणता डिपी प्लॅन चालुयं? कशाला विकासाच्या गप्पा हाणता असे म्हणत आमदार शिंदेंनी रोहित पवारांचा जोरदार टीका केली.
मी लोकांची मिटींग घेत बसलो नाही, जे जनतेला पाहिजे ते करून दाखवायचं हाच आपल्या कामाचा फंडा आहे. 427 लोकांनी डीपी प्लॅन हरकती घेतल्या होत्या, लोकांनी सांगितलं हा अन्यायकारक डीपी प्लॅन आहे, मी एवढचं बघितलं आणि लोकांच्या आणि कृति समितीच्या पाठीशी उभा राहिलो. जनतेवर अन्याय होत असताना विद्यमान आमदाराची फलटण कुठे गेली ? वकिलांची फौज कुठे गेली ? सर्वसामान्य जनतेचे घरं, दुकानं उजाडल्यावर पिटीशन दाखल करणार होते का ? असा जोरदार हल्लाबोल यावेळी शिंदे यांनी पवारांवर केला.
प्रा मधुकर आबा राळेभात व कृति समितीने सांगितलं की प्रस्तावित डीपी प्लॅन हा जनतेवर अन्याय अत्याचार करणारा आहे. त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना वस्तुस्थिती समजून सांगितली. कृति समितीने दिलेल्या निवेदनानुसार मुख्यमंत्र्यांनी डीपी प्लॅन रद्द करून नव्याने डीपी प्लॅन तयार करावा असे आदेश दिले त्यानुसार प्रशासनाने डिपी प्लॅन रद्द बाबत आदेश काढले, जनतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या डीपी प्लॅनची काही जण विद्यमान आमदाराच्या दबावाखाली येऊन भलामन करत आहेत, त्याला जामखेडची सुज्ञ जनता चोख उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास यावेळी आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केला.
चौकट
जामखेड शहराचा प्रारूप विकास आराखडा शहरातील जनतेवर अन्याय व अत्याचार करणारा असून हा विकास आराखडा हुकुमशाही पद्धतीने तयार करण्यात आला असल्याने याविरोधात जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव कृति समितीची स्थापना करण्यात आली होती. सदरचा विकास आराखडा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी समितीने धरणे अंदोलन व जामखेड बंदचे अंदोलन केले होते. त्याचबरोबर या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली होती. यावेळी कृति समितीने दिलेल्या निवेदनावर मुख्यमंत्र्यांनी ‘अ’ बाबत तात्काळ प्रस्तावित करावे असे प्रधान सचिवांना आदेश दिले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने डीपी प्लॅन रद्द केला. या निर्णयामुळे शहरातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे.