जामखेड प्रतिनिधी
आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या माध्यमातून कर्जत जामखेड मतदारसंघातील गृहिनी महिलांसाठी कर्जत आणि राशीनमध्ये पापड उद्योग व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली असून या उपक्रमाला महिला भगिनींचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल ४०० पेक्षा जास्त महिला भगिनी यात सहभागी झाल्या.
आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या सहकार्याने मतदारसंघात महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम घेण्यात येतात. बचत गटाच्या महिला आणि गरजू महिला-भगिनी स्वावलंबी बनाव्यात, स्वतःच्या पायावर त्यांनी उभा राहावे, घरी राहून त्यांना उत्पन्नाचं साधन तयार व्हावे यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. आतापर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून मतदारसंघातील हजारो महिलांना रोजगार मिळाला असून त्यांनी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरु केला आहे.
कर्जत आणि राशीनमध्ये कर्जत जामखेड एकात्मिक संस्था आणि शारदा महिला संघाच्या माध्यमातून बचत गट आणि गरजू महिलांना पापड उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. पाच दिवस घेण्यात आलेल्या या कार्यशाळेला मतदारसंघातील महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. या उपक्रमामध्ये मतदारसंघातील ४०० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला. पापड उद्योग समुहाचे प्रमुख राजेश डोंगरे आणि लक्ष्मी बंडगर यांनी महिलांना प्रात्यक्षिक दाखवून पापड बनवण्याबाबत मार्गदर्शन केले आणि महिलांकडून पापड बनवून घेण्यात आले. हा उपक्रम एक जुलै ते पाच जुलै दरम्यान घेण्यात आला आहे. कर्जतमध्ये एका कंपनीच्या वतीने सेंटर सुरु करण्यात येणार असून प्रशिक्षणातून निवड झालेल्या दर्जात्मक पापड बनवणाऱ्या सभासदाचे पुढील कामाचे नियोजन कंपनीच्या वतीने करण्यात येणार आहे आणि लगेचच पापड रोजगार निर्मितीस सुरुवात होणार आहे. यातून मतदारसंघातून २५ टन पापड निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी जी मोहीम हाती घेण्यात आली आहे त्याचे सर्व स्थरातून कौतुक होत असून मतदारसंघातील महिला भगिनींकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.