कर्जत जामखेडसह इतरही ठेवीदारांसाठी रोहित पवार मैदानात

- Advertisement -spot_img

ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीवर कारवाईची राज्यपालांकडे मागणी

जामखेड प्रतिनिधी

बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वसामान्य खातेदारांचे ९० कोटी रूपये अडकले असून या खातेदारांसह इतरही खातेदारांचे हक्काचे पैसे परत देण्यात यावेत आणि या संस्थेसह अशा सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या संस्थांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्याकडे केली. याबाबत रोहित पवार यांनी आज राज्यपाल महोदयांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि याबाबतचे पत्र त्यांना दिलं. बीडमधील ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील सुमारे साडेसहा हजारहून अधिक सभासद असून त्यांच्या सुमारे ९० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. हे सर्व खातेदार शेतकरी, कामगार व सामान्य कुटुंबातील आहेत. या सर्व खातेदारांनी आपली आयुष्याची पुंजी साठवून त्या संस्थेमध्ये दिली होती.काहींनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी तर काहींनी आपल्या आरोग्यासाठी पैसे साठवून ठेवावेत या हेतून या संस्थेमध्ये ठेवीच्या स्वरूपात पैसे ठेवले होते. परंतु या संस्थेने हे पैसे इतरत्र वळवल्याने सर्वसामान्य खातेदारांना आपलेच हक्काचे पैसे मिळत नसल्याने ते अडचणीत आले आहेत. या सर्व ठेवीदारांनी आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन यात घालण्याची मागणी केली होती. त्यांनंतर लगेचच या विषयांसंदर्भात आज आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली. सामान्य ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या या आणि अशा इतरही संस्थांची चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि कर्जत जामखेड मतदारसंघातील ठेवीदारांसह फसवणूक झालेल्या सर्वांचेच पैसे परत मिळण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल महोदयांकडे केली. याबाबतचे पत्र त्यांनी राज्यपाल महोदयांना दिले आहे.

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी यासंदर्भातील माहीती मागवून लवकरच प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याचे आश्वासन दिले असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा