जामखेड येथील खर्डा चौकातील मक्का मस्जिद समोरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आपली मोटारसायकल चोरून नेल्याची फिर्याद दाखल केल्यानंतर जामखेड पोलीसांनी सिसिटीव्ही फुटेज व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकव्दारे चोराची माहिती व ठिकाणा निष्पन्न करत जालना जिल्ह्य़ातील घनसावंगी तालुक्यातील एकलहरे येथुन रात्री ४: ०० वाजताच्या सुमारास मोठ्या शिताफीने चोरट्याच्या मुसक्या आवळून जामखेड पोलीस स्टेशनला आणत अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात चोरीचा तपास करून आरोपीस अटक केल्याबद्दल जामखेड पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर असे की, या घटनेतील फिर्याद कलिम मकसूद मुल्ला वय (४३ वर्ष) रा. बार्शी जि. सोलापुर हे आपला भाचा चाँदपाशा दादा शेख यांचेसह आपल्या हिरो कंपनीच्या मोटारसायकल क्रमांक MH.13 EA.5147 वरून दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ११: ०० वाजताचे सुमारास जामखेड येथील खर्डा चौकातील कब्रस्तान (मक्का) मस्जिद येथील धार्मिक कार्यक्रमाकरीता आले होते. तेथील धार्मिक कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी १: ०० वाजताचे सुमारास फिर्यादी यांना सदर ठिकाणी मोटारसायकल दिसली नाही. शोधाशोध करूनही मोटारसायकल न मिळाल्याने ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादी कलिम मकसूद मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीसात अज्ञात आरोपींविरुद्ध गु.र.क्र. ३८४ /२०२४ भा.न्या.स. कलम ३०५ (B) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबतची माहिती बंदोबस्तवर असलेले जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोलीस हेडकॉन्टेबल प्रवीण इंगळे यांनी तातडीने सुत्रे हालवत गुन्हा ज्या ठिकाणी घडला त्या खर्डा चौकात पोलीस विभागाने लावलेल्या सिसिटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता सदर मोटरसायकल चोर कोणाला तरी फोनवर बोलत असताना आढळून आला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती देऊन त्याव्दारे आरोपीच्या ठिकाणाचा शोध लावला. हे ठिकाण निश्चित झाल्यानंतर पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल प्रवीण इंगळे, पोलीस नाईक संतोष कोपनर,पोलीस काॅन्स्टेबल देविदास पळसे, कुलदीप घोळवे, यांचा समावेश असलेले एक पथक तयार केले. व रात्री ११:०० सुमारास सदर आरोपीच्या शोधार्थ हे पथक रवाना करण्यात आले. त्यानंतर जालना जिल्ह्य़ातील तिर्थपुरी पोलीस स्टेशनला रिपोर्टींग करत तेथून आरोपी राहात असलेल्या एकलहरे गावात पाहटे ४:०० वाजताच्या सुमारास चारही बाजूंनी सापळा रचून आरोपी कैसर नबी शेख (वय ४५) रा. एकलहरे ,ता. घनसावंगी,जिल्हा जालना येथील राहत्या घरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात जामखेड पोलीसांच्या पथकाला यश आले. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्याला यश आले नाही. शेवटी सर्व सोपस्कार पार पाडत सदर आरोपीस दुपारी ३.०० ते ४:०० वाजेताचे सुमारास जामखेड पोलीस स्टेशनला आणून सायंकाळी पाच वाजता अटक करण्यात आली.
काल दि. १ ऑगस्ट रोजी ९: २१ गुन्हा दाखल, रात्री ११:०० तपास पथक रवाना तर पाहटे ४: ०० वाटता मोठ्या शिताफीने सराईत गुन्हेगार (चोर) असलेल्या आरोपीस अटक. अश्या पध्दतीने एखाद्या सराईतपणे साधारण साडेसहा तासात आरोपी निष्पन्न करून परजिल्हातून त्यास अटक करण्याची घटना ही जामखेड पोलीस स्टेशनच्या इतिहासातील एकमेव घटना असू शकते. ही दमदार कामगिरी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल प्रवीण इंगळे, पोलीस नाईक संतोष कोपनर,पोलीस काॅन्स्टेबल देविदास पळसे, कुलदीप घोळवे यांच्या पथकाने केली आहे.
चौकट
अटक केलेल्या आरोपीस आज जामखेड न्यायालयात हजर करण्यात येणार असून जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. सदर आरोपीकडून अनेक मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. कारण हा गुन्हेगार सराईत चोर असून विविध पोलीस स्टेशनला त्याचे विरूद्ध चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती जामखेड पोलीसांकडून मिळाली आहे.