जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावाची पाणीपातळी कमी झाल्यामुळे जलकुंभ (पाण्याची टाकी) भरण्यास अधिकचा वेळ लागत आहे. त्यामुळे जलवाहिनीमध्ये आवश्यक तेवढा दाब मिळत नसल्याने पाणीपुरवठा वितरणात अडथळे येतात याबाबत नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा आठ दिवसा ऐवजी नऊ दिवसांनी होणार असल्याचे नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले आहे .
जामखेड शहर व तीन वाड्यावस्त्यांना
भुतवडा तलावातून पाणीपुरवठा होतो. शहराचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या पाहता प्रत्येक ठिकाणी पाणी देण्यासाठी आठ दिवस लागतात. तलाव ओव्हर फ्लो झाला तरी हीच परिस्थिती कायम आहे. शहर व परीसरात सर्रास कुपनलिका असल्याने पाण्याची दाहकता जाणवत नाही परंतु अनेक कुटुंबे नगरपरिषद पाणीपुरवठय़ावर अवलंबून आहे. तासभर पाणी मिळते पण चांगल्या दाबाने पाणी मिळते. त्यामुळे पाणीसाठा नागरीक करतात व वेळ पडल्यावर पाणी विकत घ्यावे लागते.
भुतवडा तलावातून सध्या जामखेड, भुतवडा ,मोहा, लेहनवाडी याठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. सध्या भुतवडा तलावात उपयुक्त पाणीसाठा ४५ दशलक्ष घनफूट उपलब्ध आहे. सध्याचा पाणीसाठा आँगस्ट पर्यंत पुरू शकतो. उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. तलावातील पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत आहे . शहराला भुतवडा तलावातून ग्रॅव्हिटी पध्दतीने जलवाहिनीतून पाणी येते ते आता कमी दाबाने येत असल्याने जलकुंभ भरण्यात येणारी अडचण येत आहे. त्यामुळे कमी दाबाने पाणी आल्यास नागरिकांना पाणी कमी मिळते त्यामुळे वेळ वाढवून द्यावा लागतो. त्यामुळे आठ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा नऊ दिवसानी झाला आहे.
जामखेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी धरणातून दहीगाव येथून प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे. योजना पूर्ण होण्यास दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत जामखेड शहर व सात वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अशीच फरफट होणार आहे.