जामखेड प्रतिनिधी
१४ वर्षाखालील मुलांच्या दोरीवरील मल्लखांब या प्रकारात अहमदनगर जिल्ह्यातील, जामखेड येथील श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेचा चि. कृष्णा सचिन जगदाळे याने महाराष्ट्रात ६ वा क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने व अहमदनगर जिल्हा मल्लखांब असोसिएशन आयोजित ४० वी मिनी व सबज्युनिअर राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धा नुकतीच जिल्हा क्रीडा संकुल, वाडीया पार्क, अहदनगर येथे दिनांक २५ मे २०२४ व २६ मे २०२४ रोजी पार पडली.
या स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, चंद्रपूर, नागपूर, जळगाव, परभणी, अमरावती, ठाणे, सोलापूर, या जिल्ह्यातील वयोवर्ष १२ व १४ वर्षाखालील २०० हुन अधिक मुले व मुलींनी सहभाग घेतला होता. या अटीतटीच्या सामन्यात वयोवर्ष १४ वर्षाखालील मुलांच्या दोरीवरील मल्लखांब या प्रकारात अहमदनगर जिल्ह्यातील, जामखेड येथील श्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेचा चि.कृष्णा सचिन जगदाळे याने महाराष्ट्रात ६ वा क्रमांक पटकावला.
कृष्णाने गेल्या वर्षभरापासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, खडतर प्रवास करीत सराव करत हा विजय संपादीत केला. त्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक बबलु (वस्ताद) टेकाळे, प्रशिक्षक गणेशदादा माने, प्रशिक्षक रोनित खुपसे, व संस्थेतील सर्वच सहकारी, तसेच नगर जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे सर्व अधिकारी पदाधिकारी आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.