
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या विरोधात, पदावरुन दूर करण्यासंबंधीची विरोधी पक्ष सदस्यांनी दिलेली सूचना आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मागे घेण्यात आली आहे. याबाबतचे पत्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते श्री.अंबादास दानवे यांनी सभापती महोदयांना सादर केले आहे. या पत्रावर श्री. दानवे यांच्यासह विधानपरिषदेतील सन्माननीय सदस्य श्री. एकनाथराव खडसे, अॅड.अनिल परब, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.अभिजित वंजारी, श्री.सचिन अहिर, श्री.सुनिल शिंदे, श्री.राजेश राठोड, श्रीमती प्रज्ञा सातव, श्री.जगन्नाथ अभ्यंकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


“महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभागृहात दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांकडून व्यक्त झालेल्या तीव्र भावना, उदभवलेल्या काही प्रसंगांमुळे विरोधी पक्ष नेत्यांचा आणि सदस्यांचा हक्क अबाधित राखला जात नसल्याने सार्वभौम सभागृहाची प्रतिष्ठा राखली जावी यासाठी दि. 19 मार्च, 2025 च्या सूचनेद्वारे आम्ही माननीय सभापतींना पदावरुन दूर करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र दिनांक 21 मार्च, 2025 रोजी मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व सभागृहाचे नेते उप मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेच्या अनुषंगाने, उपरोक्त सर्व मुद्यांवर मा.मुख्यमंत्री महोदयांनी समाधानकारकरित्या आश्वस्त केले असल्याने, सभागृहात खेळीमेळीचे वातावरण रहावे आणि लोकशाहीच्या या पवित्र मंदिराचा सन्मान राखला जावा म्हणून आम्ही मा.सभापतींना पदावरुन दूर करण्यासंबंधी दिलेली संदर्भाधीन प्रस्तावाची सूचना मागे घेत आहोत, असे आज दिनांक 26 मार्च, 2025 रोजी मा.सभापती महोदयांना विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद, श्री. अंबादास दानवे यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
