श्रीनागेश्वर पालखी सोहळ्यानिमित्तरविवारी जामखेडला नामसाप्ताहास प्रारंभ

- Advertisement -spot_img

जामखेड (प्रतिनिधी)

जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त रविवार दिनांक 4 ऑगस्ट पासून येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.


या निमित्ताने सात दिवस शिवलीलामृत पारायण तसेच यावेळी संत गोरोबा काकांचे श्रीक्षेत्र तेर येथील सकल संत चरित्रकथा निरुपणकार ह.भ.प. श्री. दिपकजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून पसायदान भावार्थ निरुपण रविवार पासून दररोज दुपारी 4 ते 5.30 वा. होणार आहे.

या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला श्रीनागेश्वर पालखी सोहळा शुक्रवार ( दि. 9 ऑगस्ट )
होईल.

जामखेड -खर्डा रस्त्यावर वैतरणा नदीतीरावर श्रीनागेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. शके११४४ मध्ये या मंदिराचे बांधकाम झाले असल्याचा उल्लेख येथे आहे.त्या काळातील शास्त्रयुक्तपद्धतीने केलेले दगडी काम आजही सुस्थितीत आहे. उत्तराभिमुख असलेल्या मंदिरातील गाभाऱ्यात काळी पाषाणाची पिंड आहे. पिंडीवर भगवान शंकराचा मुखवटा व नागाचा फडा आहे. समोर नंदी व पितळी भव्य त्रिशूळ आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला औदुंबर व उजव्या बाजूला पुरातन काळातील काही साधूंच्या समाधी आहेत.

श्रावण शुद्ध पंचमीला (नागपंचमी) या ग्रामदेवतेची यात्रा असते. या उत्सवाच्या निमित्ताने येथे 4 ऑगस्ट पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे 4 ते 6 काकडा, सकाळी 8:30 ते 10 शिवलीलामृत पारायण 10 ते 12 वा. गाथा भजन, दुपारी 4 ते 5.30 वा. पसायदान भावार्थ निरुपण, 5.30 ते 6.30 वा. सायंकाळी ७ ते ९ वा. कीर्तन व नंतर आलेल्या सर्व भक्तांना भोजन असा भव्य कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे.

रविवारी दुपारी 2 वाजता विना पूजन करून सप्ताहस प्रारंभ होईल सायंकाळी श्रीक्षेत्र सिताराम गड खर्डा येथील मठाधिपती महालिंग महाराज नगरे यांचे कीर्तन होईल. सोमवारी ज्ञानेश्वर महाराज घोडके श्रीगोंदा, मंगळवारी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, बुधवारी चेतन महाराज बोरसे मालेगाव, गुरुवारी रामकृष्ण महाराज रंजवे पाटोदा, शुक्रवारी संदीप महाराज येवले नाशिक, शनिवारी अशोक महाराज हुंबे आळंदी यांची कीर्तने होतील. रविवारी दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक ज्ञानेश्वर महाराज कदम मोठे माऊली यांचे कार्याचे कीर्तन होईल व महाप्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगत होईल.

पालखी सोहळा
शुक्रवार 9 ऑगस्ट रोजी श्रीनागेश्वराची विधिवत पूजा होईल. नंतर पालखीमध्ये श्रीनागेश्वराचा मुखवटा ठेऊन ही पालखी रथात ठेवली जाईल. टाळ मृदुंगाच्या गजरात हरहर महादेवाच्या जयघोषात मिरवणुकीस सुरुवात होईल. श्रीनागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, संविधान चौक, श्री विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, महादेव गल्लीमार्गे ही दिंडी नव्याने झालेल्या वैतरणा नदीतील रस्त्याने श्रीनागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचेल नंतर आरती व महाप्रसाद होईल. दरम्यान, दिंडोरी प्रणीत श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी मंदिरासमोर होमहवन करतील.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा