शनिवारी जयंती सोहळ्यास उपस्थित राहण्याचे स्वागताध्यक्ष व विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे आवाहन..

जामखेड प्रतिनिधी
चोंडी विकास आराखड्याला राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे विकास आराखड्यातील कामे ३१ मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे चोंडी तीन वर्षात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन व तीर्थक्षेत्र स्थळ म्हणून नावारूपास येईल असा विश्वास विधानपरिषदेचे सभापती व त्रिशताब्दी जयंती सोहळ्याचे स्वागताध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त करीत सरकारने आराखड्यास दिलेल्या मान्यतेचे स्वागत केले आहे.

तसेच शनिवार होणा-या जयंती सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून राज्यातील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची शनिवारी त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने पत्रकारांशी स्वागताध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शनिवारी ३१मे रोजीच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त देशात आणि राज्यात विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. चौंडी येथील विकास आराखड्यासाठी राज्य सरकारने ६८१ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे चोंडीची ओळख अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डीचे साईबाबा, शनिशिंगणापूरचे शनिदेव व अहिल्यादेवींचे तिर्थक्षेत्र चोंडीची ओळख होईल.
चोंडी एक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन म्हणून नावारूपाला येईल.

चोंडीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता पुरातत्वीय जाण असलेल्या व्यक्ती आणि संस्थांकडूनच विकास आराखड्यातील कामे ३१ मे २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अहिल्यानगर येथे उभारण्यात येत असलेले वैद्यकीय महाविद्यालय, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हाळगाव येथील सभागृह इमारत उभारणी यासदेखील प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार
चोंडी येथे शनिवारी (दि. ३१ मे) होणाऱ्या जयंती कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, छगन भुजबळ, पंकजा मुंडे, अतुल सावे, जयकुमार गोरे, दत्तात्रय भरणे, आजी-माजी आमदार-खासदार, मान्यवर उपस्थित राहणार आहेत. चोंडी येथे सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.