शालेय विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे बसची व्यवस्था करावी अन्यथा अंदोलन- बापूसाहेब शिंदे
जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या बस दररोज, नियमित व वेळेवर येत नसल्याने या मुलामुलींचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून अनेकांवर यामुळे शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे.
याबाबत विचारणा केली असता कर्तव्यावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना विद्यार्थी व विद्यार्थीनींना उध्दट उत्तरे दिली जातात. एकंदर एसटी प्रशासनाच्या गलथान व भोंगळ कारभारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून यात तात्काळ सुधारणा न झाल्यास विद्यार्थ्यांसमवेत तिव्र अंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जामखेड तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांनी दिला आहे.
याबाबत बापूसाहेब शिंदे यांनी जामखेडचे तहसिलदार गणेश माळी व आगार व्यवस्थापक प्रमोद जगताप यांना रितसर निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची खुप मोठी संख्या आहे. त्यामध्ये मुलींचेही प्रमाण मोठे आहे. त्यांना शाळा काॅलेजमध्ये येण्यासाठी एसटी बस हा एकमेव सुरक्षित व परवडणारा पर्याय आहे. मात्र असे असताना जामखेड आगारातील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे अनेक वेळा दोनदोन चारचार दिवस बस येत नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच काहींवर शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. याबाबत एसटी प्रशासनाला वारंवार अर्ज विनंत्या, निवेदने व अंदोलनाचा इशारा देऊनही काही फरक पडत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आज दि. २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांसमवेत तहसिलदार व आगार व्यवस्थापक यांची भेट घेतली. व त्याबाबत निवेदन दिले. तसेच कारभारत सुधारणा न झाल्यास तिव्र अंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना यासंदर्भात भेटणार असल्याचेही सांगीतले.