वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन दिले निवेदन

जामखेड प्रतिनिधी
अहिल्यानगर मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी देताच हे महाविद्यालय कर्जत-जामखेड मतदारसंघात होण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी फिल्डींग लावली आहे. यासाठी त्यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

या महिन्याच्या सुरवातीला राज्य मंत्रिमंडळाची चोंडी (ता. जामखेड) येथे बैठक झाली आणि या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या महाविद्यालयासाठी जागेचा शोधही युद्धपातळीवर घेण्यात येत आहे. अहिल्यानगर शहराच्या आसपास अशी जागेचा शोध घेण्यात आला, परंतु पुरेशी आणि सर्व दृष्टीने योग्य अशी जागा उपलब्ध होत नाही. तसंच व्यावहारिक विचार केला तर अहिल्यानगर शहरात विळद घाटात विखे पाटील फौंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय आहे, शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय आहे आणि इतरही मोठमोठी खासगी रुग्णालये आहेत.

त्यातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही अहिल्यानगर शहराच्या आसपास झाले तर वैद्यकीय सुविधांचे केंद्रीकरण होईल आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी कायमच थेट जिल्याच्या ठिकाणी यावे लागेल. त्यामुळे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहराच्या जवळ होण्याऐवजी कर्जत-जामखेड मतदारसंघात झाले तर त्याचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्यासह बीड, धाराशिव, सोलापूर, पुणे या लगतच्या जिल्ह्यातील गावांना होणार आहे. कारण या सर्व जिल्ह्यांमधील वैद्यकीय सुविधा या जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत.

त्यामुळे या जिल्ह्यातील सीमेवरच्या गावांना त्यांचा फायदा होत नाही. त्यासाठी त्यांना थेट मोठ्या अंतराचा पल्ला कापून जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. परंतु अहिल्यानगरमधील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय हे कर्जत-जामखेड मतदारसंघात झाले तर त्याचा अहिल्यानगरसह या लगतच्या जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा आहे. विशेष म्हणजे कर्जत-जामखेड मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्यासाठी आमदार रोहित पवार हे गेल्या २०२२ पासून प्रयत्न करत असून त्यासाठी त्यांनी सरकारकडे पत्रव्यवहारही केला असून हा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर कर्जत-जामखेड मतदारसंघाचा निर्विवाद हक्क असल्याचे आमदार रोहित पवार यांचे म्हणणे असून यासाठीच त्यांनी काल (मंगळवार) वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची मुंबईत भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली आणि याबाबतचे पत्रही दिले.

मतदारसंघात सर्वच प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आमदार रोहित पवार हे गेल्या टर्मपासून करत आहेत. रस्यांचे जाळे निर्माण करणे असो की कर्जत, जामखेड या दोन ठिकाणी प्रत्येकी १०० खाटांचे तर मिरजगाव येथे ५० खाटांचे अशा एकूण तीन उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरी आणून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्याचेही काम आमदार रोहित पवार यांनी केले. तसेच कर्जतमध्ये महिला व बाल रुग्णालयाचा प्रस्तावही शासन स्तरावर प्रलंबित आहे. यासर्व सुविधांचा फायदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व परिचर्या महाविद्यालयासाठी होणार आहे. आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीही त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांचा सरकारने व्यावहारिकपणे विचार केल्यास पुढील काळात कर्जत-जामखेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेले पहायला मिळेल.
चौकट
‘‘कर्जत-जामखेड मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्यासाठी २०२२ पासून माझा पाठपुरावा सुरु आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघ हे एकदम योग्य ठिकाण आहे. याचा अहिल्यानगर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील गावांनाही फायदा होणार आहे. त्यामुळे हे महाविद्यालय कर्जत-जामखेडमध्येच झाले पाहिजे. सरकारनेही कोणताही भेदभाव न करता गुणवत्तेच्या आधारे मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावं आणि ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी तशी घोषणा करावी, ही विनंती!
आ. रोहित पवार