जामखेड शहरालगत विंचरणा नदीकाठी असलेल्या तपनेश्वर महादेव मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पुर्ण झाले असून काल दि.२६ एप्रिल रोजी महादेव व नंदी या देवतेची पुनर्प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा ह.भ.प. कैलास महाराज भोरे (देवदैठणकर) यांचे शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाचा पुर्वी सकाळी ८ : ०० जिर्णोद्धार समितीचीचे सदस्य हे कार्यक्रमाची तयारी करत असताना भगवान शंकराचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या नागदेवतेने (नाग) प्रत्यक्ष हजेरी लावून दर्शन दिले. त्यामुळे जामखेड व परिसरात याच घटनेची चर्चा होती. तर दिवसभर चाललेल्या पुनर्प्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा व
महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
जामखेड शहरालगत असलेल्या विंचरणा नदी काठावर वसलेले तपनेश्वर महादेव मंदिराची बरीच दुरावस्था झाली होती. तसेच मंदिरही अगदी लहान होते. त्यामुळे भाविकांना पुजाअर्चा करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे यापरिसरातील नियमित दर्शन घेणाऱ्या भाविकांपैकी काही भाविकांनी एकत्र येत या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर २०२३ रोजी काम हाती घेतले. मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम दानशूर व्यक्ती सहकार्याने काही महिन्यांमध्ये म्हणजेच अल्प वेळात या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पुर्णत्वास गेले. आणि काल दि. २६ एप्रिल रोजी कलशारोहन कार्यक्रमाने या जिर्णोद्धाराच्या कामाचा समारोप झाला.
गुरूवार दि.२५/०४/२०२४ रोजी ४.०० वा. नगर अर्बन बँक पासून भव्य कलश मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांनी व भाविकांनी मोठय़ा संख्येने सहभाग नोंदवाला.
काल दि. २६ एप्रिल रोजी सकाळी ८ : ३० वाजता पुरोहित विनायक जोशी यांच्यासह ११ पुरोहित व परिसरातील पाच जोडप्यांच्या सहभागातून शास्त्रोक्त पद्धतीने होमहवन व महापुजा संपन्न केली. तर महादेव व नंदी या देवतेची पुनर्प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा ह.भ.प. कैलास महाराज भोरे (देवदैठणकर) यांचे शुभहस्ते संपन्न. यानंतर झालेल्या महाआरती नंतर महाप्रसाद वाटपास सुरूवात झाली. रात्री ९ : ०० वाजेपर्यंत चाललेल्या महाप्रसाद वाटपाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला .
मंदिर जिर्णोद्धार व काल झालेल्या कलशारोहन कार्यक्रमासाठी मंदिर जिर्णोद्धार समिती व भाविकांनी मोठे परिश्रम घेतले. तसेच या मंदिराच्या सुशोभीकरणाचे उर्वरित काम करण्यासाठी भाविक व दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन तपनेश्वर जिर्णोद्धार मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.