जामखेड प्रतिनिधी : संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे जामखेड शहरात सुमारे 20 हजार ते 25 हजार वारकऱ्यां समवेत अत्यंत भक्तिमय वातावरणात आगमन झाले. यावेळी पहिले रिंगण जमादारवाडी जामखेड येथील संत वामनभाऊ गड येथे सोमवारी दुपारी तीन वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री. विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सहा जुलै रोजी श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून संत वामनभाऊ महाराज यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी,मातकुळी असा प्रवास करत सोमवारी जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथे सकाळी दिंडी दाखल झाली. जामखेड शहरात आगमन होताच तपनेश्वर येथे श्रीनागेश्वर भजनी मंडळाने टाळ मृदंग विना घेऊन भजन करत करत दिंडीला सामोरे जाऊन दिंडीचे स्वागत केले.
शहरात ठिकठिकाणी वारकऱ्यांना मोफत उपचार व औषध वाटप करण्यात आले. तसेच शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी फळे, चहा बिस्कीट,औषध , पाणी व्यवस्था केली होती.
शहरातील श्रीविठ्ठल मंदिरात संत वामनभाऊ महाराज यांची दिंडी पोहोचतात श्रीविठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले तेथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर जगदाळेवस्ती येथे पंगत झाली
जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिर येथे दुपारी दिंडीचे आगमन झाले. यावेळी जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री विठ्ठल महाराज यांचा सन्मान करण्यात आला. व रिंगण सोहळा सुरू झाला. मंदिराच्या भव्य प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला होता. पताकाधारी वारकरी, विणेकरी टाळ मृदंगाच्या तालावर पुंडलिक वरदे हरी विट्ठल …हा जय जयकार करत भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करू लागले. त्या पाठोपाठ दिंडीतील दोन अश्व धावू लागले. या अश्वांनी परिसरातून आलेल्या भाविकांची डोळ्याची पारणे फेडली. यावेळी भाविकांनी एकाच जय जयकार केला.
वारकरी परंपरेचे खेळिया प्रकरणातील अभंग झाले. या अभंगाच्या चालीवर अनेक पुरुष व महिला भक्तांनी फुगडीचा आनंद घेतला. यावेळी जमादारवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिंगण सोहळ्या दरम्यान या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
या भागातून पंढरपूरला जाणारी संत वामनभाऊ महाराज यांची ही सर्वात मोठी दिंडी आहे. व या एकमेव दिंडीचे येथे रिंगण होते. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते. या दिंडीला अनन्य साधारण महत्व आहे.राज्यभरातून सुमारे 25 हजाराहून आधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे भोजन करून सारोळा येथे ही दिंडी मुक्कामी पोहोचली .