जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद हद्दीतील जामवाडी या ठिकाणी मातकुळी रोडकडुन जामखेड कडे येत असलेल्या एका चार चाकी वाहनावरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटून चारचाकी वाहन रस्त्याच् बाजुच्या विहिरीत पडून चार तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आज बुधवार दि 15 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी साडेचार वाजता ही घडली घटना घडली आहे.
मृतांमध्ये आशोक विठ्ठल शेळके, वय 29, रामहरी गंगाधर शेळके, वय 35, किशोर मोहन पवार, वय 30 तीघे रा.जांबवाडी तर चक्रपाणी सुनिल बारस्कर 25 वर्षे, रा. राळेभात वस्ती जामखेड या चौघांचा समावेश आहे. वरील चार तरूण मातकुळी कडून जांबवाडी मार्गी जामखेडकडे येत होते. जांबवाडी जवळ रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पवनचक्की कंपनीची ची बोलेरो गाडी एम एच. 23 ए. यु. 8485 ही पडल्याने एकच मोठा आवाज झाला यामुळे जवळच रस्त्याचे खडीकरण काम सुरू असल्याने तेथील मजूर घटनास्थळी धावले, यानंतर चारही तरूणांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांच्या मदतीने स्थानिक ग्रामस्थांना विहीरी मध्ये दोरी व क्रेन च्या सहाय्याने आत उतरवले होते.
यावेळी संपुर्ण गाडी पाण्यात बुडाली होती. मात्र तरी देखील मोठी तारेवरची कसरत करत आत उतरलेल्या ग्रामस्थांनी पाण्यात बुड्या घेऊन व गाडीच्या काचा फोडून चारही तरुणांना पाण्याच्या बाहेर काढले. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी पोलीस निरीक्षक महेश पाटील सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे कैलास माने सर यांच्या सह जामवाडी येथील ग्रामस्थांनी मदत केली. आणि चारही तरुणांना ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण तत्पुर्वीच चौघांचाही मृत्यू झाला होता. अद्यापही बोलेरो गाडी विहिरीत आहे.
चक्रपाणी सुनील बारस्कर हा पवनचक्की कंपनीच्या गाडीवर चालक होता. पवनचक्की कंपनीचे काम बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात काम सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. चार पैकी दोघांचे लग्न झाले होते. त्यांना लहान लहान मुले आहेत. तर दोघे अविवाहित होते.