जामखेड प्रतिनिधी
दिवसेंदिवस लिखाणाची पध्दत बदलत चालली आहे. वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे बातम्या देताना सुत्रांनी माहिती, प्रश्नचिन्हांकीत अशा पध्दतीने मांडणी करतात हे त्या संपादकाचे वैयक्तिक मत असते. पत्रकारिता करणे हा सोपा विषय राहिला नाही. पत्रकारावर जेवढा विश्वास लोकांचा आहे. तेवढा विश्वास कोणावर नाही. पेपरमध्ये बातमी छापून आली तर त्याचा दाखला सर्वसामान्य लोक देतात. आपल्याला न्याय देतील अशी आशा ते बाळगून असतात. असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सोमवारी तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात साजरी करण्यात आली यावेळी प्रा. मधुकर राळेभात बोलत होते. यावेळी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक, भिमटोला संघटनेचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, संजय काशिद, पोपट राळेभात, सुनील यादव यासह शहर व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, पूर्वी राजे महाराजांच्या काळात काही माहिती, नियम अगर कायदा सुव्यवस्था जनतेला द्यायची झाली तर दंवडी देऊन दिली जात असे व ही प्रथा खूप दिवस चालली. यानंतर इंग्रजांनी लिखित पत्रकारिता चालू केली त्यानंतर हिंदी व १९३२ साली पहिले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण चालू केले. दर्पण म्हणजे आरसा हा एक नावाजलेले शब्द होता. त्यामुळे पत्रकारीतेवर मोठा विश्वास होता. जे लिहून आले ते पेपरमध्ये छापून आले आहे. यातूनच देशात क्रांतीचे बीजे रोवली गेली. पत्रकारीता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. लोकशाहीमध्ये आपले मत परखड मांडण्याचे साधन आहे. त्यामुळे लोकशाही चांगल्या प्रकारे जिवंत आहे.
इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक म्हणाले, सध्याच्या काळात पूर्णवेळ पत्रकारीता करणे कठीण झाले आहे. परखड मत मांडले तर एकाला राग येतो व दुसऱ्याला आनंद होतो. तसेच पत्रकारांच्या अर्थिक समस्या आहेत. शासन पत्रकारांसाठी योजना राबवते त्यामधील अटी खूप जाचक आहेत. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे निर्वाह भत्ता दिला जातो त्याप्रमाणे पत्रकारांना देण्याची आवश्यकता आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिठूलाल नवलाखा यांनी केले तर आभार अशोक निमोणकर यांनी मानले. यावेळी मैनुद्दीन तांबोळी, धनराज पवार, अशोक वीर, अविनाश बोधले, किरण रेडे, संजय वारभोग, पप्पू सय्यद, अजय अवसरे, यासीन शेख, संतोष गर्जे, तुकाराम अंदुरे आदी उपस्थित होते.