गुणवंतांचा गौरव, आनंदी बाजार,लकी ड्रॉ, राष्ट्रीय कीर्तन, व्याख्यान, नृत्याविष्कार इ.विविध कार्यक्रमांचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी
जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या ‘मिशन आपुलकी ‘ या उपक्रमांतर्गत आणि पं.स.जामखेड शिक्षण विभागाच्या सहकार्याने जि.प.प्रा.शाळा बांधखडक येथे शनिवार दि.२६ एप्रिल ते सोमवार दि.२८एप्रिल २०२५ या कालावधीत तीन दिवसीय ‘ शिक्षणोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यात पुढीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

शनिवार दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ८:०० ते १०:०० या वेळेत ‘आनंदी बाजार ‘ अर्थात विद्यार्थ्यांचे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, सकाळी १० ते १२ या वेळेत मराठवाड्याच्या आधुनिक बहिणाबाई सौ. शशिकला गुंजाळ (वांगी ता. भूम जि. धाराशिव), प्रतिभावंत ग्रामीण साहित्यिक सौ. सुवर्णा तेली (सांगोला जि.सोलापूर), प्रगतशील कृषिकन्या सौ. सोनाली जाधव (नांदूरघाट ता.केज जि.बीड) , महसूल सहायक पदी निवड झालेल्या कु. सोनल फरांडे (जामखेड) व मुंबई पोलीस पदी निवड झालेल्या कु. राधिका बडे (बाळगव्हाण) यांच्या प्रमुख उपस्थितीत स्त्री सक्षमीकरणावर आधारित ‘आम्ही सावित्रीच्या लेकी ‘ हा ज्ञान व मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि भव्य लकी ड्रॉ तर रात्री ८ वा. संत साहित्याचे अभ्यासक तथा साक्षेपी समिक्षक डॉ. ज्ञानेश्वर थोरात (मंचर जि. पुणे)यांचे अध्यक्षतेखाली प्रसिद्ध वक्ते श्री.धर्मराज करपे(गेवराई जि.बीड)यांचे व्याख्यान संपन्न होईल.

रविवार दि.२७एप्रिल रोजी स.१०:०० वा.मृद व जलसंधारण विभागाचे महाराष्ट्र राज्याचे माजी सचिव श्री.सुनील चव्हाण (भा.प्र.से.)यांचे अध्यक्षतेखाली तसेच पुणे येथे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या श्रीम.काजल भट , पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी तसेच जालिंदरनगर सारख्या आंतरराष्ट्रीय शाळांचे शिल्पकार शिक्षणमहर्षी दत्ता वारे गुरूजी आणि जामखेड येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा जैन काॅन्फरन्स नवी दिल्लीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांच्या शुभहस्ते तालुक्यातील जि.प.शाळांतील विविध शासकीय स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न होणार आहे. तर याच दिवशी सायं ६ वा देऊळगाव राजा (जि.बुलढाणा) येथील महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर म.झगरे गुरूजी वाकदकर यांचे सामाजिक व शैक्षणिक जनजागृतीपर राष्ट्रीय कीर्तन होईल.

सोमवार दि.२८एप्रिल रोजी सायं. ७:०० वा.जामखेड तालुक्याचे गटविकास अधिकारी शुभम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जामखेडचे गटशिक्षणाधिकारी विजय शेवाळे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.जालिंदर खताळ व नायगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत बांधखडक शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन (गॅदरिंग) कार्यक्रमाने शिक्षणोत्सवाची सांगता होईल.

वरील सर्व कार्यक्रमांच्या यशस्विते साठी शाळेतील आजी माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक, ग्रामस्थ व महिला विशेष परिश्रम घेत असून तालुक्यातील सर्व शिक्षक बंधु भगिनी तसेच बांधखडक पंचक्रोशीतील सर्व शिक्षणप्रेमी नागरिक व कलारसिकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक विकास सौने व आदर्श शिक्षक मनोहर इनामदार यांनी केले आहे.