राजकीय जोडे बाजूला ठेवत शिक्षकांना राजकारणात ओढू नये म्हणून अपक्ष – विवेक कोल्हे
माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांचे नातू व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे हे श्री गणेश कारखाना निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले होते.दि.३१ मे रोजी राजकीय पक्षीय जोडे बाजूला ठेवत नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा अपक्ष उमेदवारी अर्ज आयुक्त कार्यालय नाशिक येथे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. राधाकृष्ण गमे यांच्याकडे सुपूर्द करत दाखल केला.याप्रसंगी मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या मा.सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार,के के वाघ शिक्षणं संस्थेचे श्री. समीर वाघ,प्रा.श्री.साळुंके सर,श्री.राजेंद्र कोहकडे,प्रा.श्री.अजयकुमार ठाकूर, प्रा.श्री.रावसाहेब शेंडगे,सचिन देसले आदीसह शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रतिक्रिया देताना विवेक कोल्हे म्हणाले की शिक्षक हे देशाचा कणा आहेत.ते राष्ट्र जडणघडण करण्यात मोलाचे योगदान देतात.मात्र विविध प्रश्नांच्या विळख्यात पिढी घडवणारे गुरुजन अडकून पडले असताना त्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी मला अनेकांनी मागणी केल्यानंतर विधानपरिषद लढवण्याचा मी निर्णय घेतला आहे.अनेक शिक्षक संघटना,पाच जिल्ह्यातील शिक्षक संस्थाचालक यांच्याशी संवाद साधल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.
प्रश्नांच्या गुंत्यात शिक्षकांना अडकून ठेऊ नये.शिक्षक पवित्र ज्ञानदानाचे काम करतात त्यांचे प्रश्न सुटण्यासाठी मला काम करण्याची ही संधी आहे असे मी मानतो.इतर देशांच्या तुलनेत भारताची क्षमता मोठी आहे मात्र शिक्षकांचे प्रश्न अनेक वर्ष सुटत नसतील तर त्यासाठी कुणीतरी पुढे होऊन सक्षम लढणे गरजेचे आहे.आमच्या कुटुंबाचं वसा हा सेवा हाच धर्म आहे त्यानुसार आम्ही तीन पिढ्या कार्यरत आहोत.शिक्षकांचा सन्मान टिकावा आणि त्यांचे प्रश्न सुटावे यासाठी माझे काम असणार आहे. माझी उमेदवारी ही शिक्षकांच्या आशीर्वादाने आहे त्यानुसार मी पूर्ण ताकतीने सकारात्मक कामाच्या रूपाने ही निवडणूक जिंकणार आहे असा विश्वास विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.
चौकट –
आपल्या या निवडणुकीत सुधीर तांबे यांचे काही मार्गदर्शन आहे का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता निश्चितच पाचही जिल्ह्यात संस्था चालक,शिक्षक,संघटना यांच्या भेटी घेतल्या असता सुधीर तांबे यांचे उच्च काम असल्याचे एक प्रमाण दिसले,त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे व त्यांची साथ आपल्याला आगामी काळात मिळेल असे मत विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.