खर्डा शहरात प्रा. सचिन (सर) गायवळ यांच्या वतीने मोफत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू..

जामखेड प्रतिनिधी
खर्डा भागातील पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरवेल व विहीरी कोरड्या पडल्याने परीसरात पाणी समस्या निर्माण झाली होती. पाण्यासाठी खर्डा व परिसराच्या भागातील नागरिकांना व महिलांना वणवण भटकत रहावे लागत होते. तसेच नागरिकांना व जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागत होती. हीच गैरसोय लक्षात घेऊन खर्डा भागातील पाणीटंचाईची धग कमी करण्याचा प्रयत्न म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिन (सर) गायवळ यांच्या वतीने नागरिकांसाठी मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

संपूर्ण महाराष्ट्र सध्या उष्णतेची लाट पाहता जवळ जवळ सर्व खेड्यापाड्यात भीषण पाणीटंचाई सुरू झाली आहे, अन मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात खर्डा शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या मोहरी तलाव व खैरी प्रकल्प तलावातील पाण्याची पातळी खालावली आहे. परंतु प्रत्यक्ष पाहणी केली असता पिण्यासाठी पाणी मुबलक शिल्लक असल्याचे दिसून येत आहे, परंतु उन्हाची तीव्रता पाहता तलावातील पाण्याची बाष्पीभवन होऊन पाणीसाठा कमी होऊ लागला असल्याने खर्डा ग्रामपंचायतच्या वतीने नळाचे पाणी नागरिकांना अर्धा तास सोडण्याचा निर्णय घेतल्याने खर्डा शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

अगोदर चार-पाच दिवसांनी होणारा पाणीपुरवठा जर अर्धा तास पाणी नळाला येत असल्याने नागरिकांना भर उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याचे पाहून वडार समाज संघटनेचे अध्यक्ष बबलू सुरवसे यांनी प्रा. सचिन सर गायवळ यांना खर्डा शहराच्या पाणीपुरवठ्याची परिस्थिती सांगितली असता, त्यांनी तात्काळ एक पाण्याचा टँकर मोफत खर्डा ग्रामस्थांसाठी दिला असून त्याद्वारे ज्या ठिकाणी पाणीपुरवठा कमी होत आहे त्या ठिकाणी पाण्याचा टँकर सुरू केला असल्याने ग्रामस्थांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आहे.
