पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ मे रोजी चौंडीत?

जामखेड प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती ( त्रिशताब्दी ) चोंडी ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे ३१ मे २०२५ रोजी सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. सदर जयंती सोहळ्यास उपस्थित रहावे असे विनंतीपूर्वक निमंत्रण यावेळी पंतप्रधान महोदय यांना तसेच राष्ट्रपती यांना विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी दिले आहे त्यांनी ते स्वीकारले आहे यामुळे या वर्षी चौंडीत पंतप्रधान व राष्ट्रपती येणार आहेत अशी शक्यता आहे.

जानेवारी २०२५ मध्ये दिल्ली येथे जाऊन देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी यांची नवनिर्वाचित विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नवी दिल्ली येथे सहकुटुंब भेट घेतली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती देऊन पंतप्रधानाचा सन्मान करण्यात आला .

यावेळी विधानपरिषदेच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी राम शिंदे यांचे अभिनंदन करून मोलाचे मार्गदर्शन केले. माझ्यावर विश्वास ठेवून मला सभापती पदाची संधी दिल्याबद्दल राम शिंदे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी कुटुंबाची देखील आपुलकीने चौकशी केली.

तसेच आज दिल्ली येथे जाऊन देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती ( त्रिशताब्दी ) चोंडी ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथे ३१ मे २०२५ रोजी साजरी होणार आहे यासाठी निमंत्रण दिले. त्यांनी ही ते स्विकारले आहे असे सभापती प्रा शिंदे यांनी सांगितले.

याच बरोबर हिरज रोडवरील ४८२ एकरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्वतंत्र ५० कोटींची प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन बांधले जात आहे. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पूर्णाकृती स्मारक देखील उभारण्यात आले आहे. ३१ मे रोजी अहिल्यादेवींच्या जयंतीचे औचित्य साधून प्रशासकीय इमारत व अहिल्यादेवींच्या स्मारक लोकापर्णासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठविण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सध्याच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात ११ संकुले असून त्याठिकाणी ४४ कोर्स सुरू आहेत. मुला-मुलींचे वसतिगृहे देखील याच परिसरात आहेत. विद्यापीठाच्या महत्त्वाच्या परीक्षा विभागाला स्वतंत्र जागाच सध्याच्या ठिकाणी नाही. विद्यापीठात सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर, छत्रपती संभाजी महाराज, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या नावे अध्यासन केंद्रे आहेत. पण, ते कोणत्या ठिकाणी आहेत हे लवकर सापडत नाही. त्यासाठी स्वतंत्र जागाच नाही.
या पार्श्वभूमीवर ३१ मे रोजी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सर्व विभागांचे कामकाज ४८२ एकरातील नवीन इमारतीतून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर १८ मार्च रोजी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली त्या बांधकामाचा आढावा घेतला दरम्यान, दोन्ही महत्त्वाच्या लोकापर्णाच्या कार्यक्रमासाठी राज्यपालांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण पाठविण्यात आले आहे ते निश्चितपणे येतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. महानवर यांनी व्यक्त केला.