प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यभर आमदारांच्या घरासमोर आंदोलन.

जामखेड (प्रतिनिधी) –
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले, तालुकाध्यक्ष नय्युम भाई सुभेदार व शहराध्यक्ष दिनेश राळेभात यांच्या नेतृत्वाखाली ११ एप्रिल रोजी मध्यरात्री बारा वाजता जामखेड तालुक्यातील चोंडी येथे विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या निवासस्थानासमोर मशाल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व दिव्यांगांच्या मानधनाच्या मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधणे हे होते.

या आंदोलनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सप्ताहात महाराष्ट्रभर आमदारांच्या घरासमोर आंदोलन राबवण्यात आले. जामखेडमध्येही मोठ्या संख्येने प्रहार सैनिक, शेतकरी आणि दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला.

तालुकाध्यक्ष नय्युम भाई सुभेदार यांनी यावेळी सांगितले की, “जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारने प्रत्येक पिकाला हमीभाव द्यावा, तसेच जाहीर केलेल्या कर्जमाफीनुसार प्रत्यक्ष कर्जमाफी करण्यात यावी. शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा स्वतः उतरवून त्यांचं संरक्षण करणं आवश्यक आहे, तरच शेतकरी सुखी होऊ शकतो. दिव्यांगांच्या पगारातही वाढ करून त्याचा तात्काळ शासन निर्णय (जीआर) काढावा.”
जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले यांनी यावेळी सांगितले की, “शेतकरी खूप मोठ्या संकटांना तोंड देत आहे. अनेक अधिकारी व कर्मचारी हे स्वतः शेतकरी कुटुंबातील आहेत, त्यामुळे त्यांनीही शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी शासन दरबारी भूमिका घ्यावी. शासनाने दिव्यांग बांधवांसाठी पगारवाढीचा निर्णय तातडीने अमलात आणावा. तसेच आमदार प्रा. राम शिंदे विधान परिषदेचे सभापती आहेत, त्यांनी जर यामध्ये लक्ष घातले, तर अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात.”

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले व तालुकाध्यक्ष नईम सुभेदार यांनी शासनाच्या ढिसाळ धोरणांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनात प्रमोद खोटे (युवक तालुकाध्यक्ष), सचिन उगले (दिव्यांग तालुकाध्यक्ष), संजय मोरे (मूकबधिर संघटक), भोसले सर, दिनेश उगले, बलभीम पाटील, ईश्वर ससाणे, ढोले ताई, पत्रकार राजेश भोगील आदींसह शेतकरी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे महेश पाटील साहेब व बीडीओ साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद गटाध्यक्ष राहुल भालेराव, डॉ. एसान शेख, दिव्यांग सेल तालुकाउपाध्यक्ष संजय मोरे, शहराध्यक्ष दिनेश राळेभात, शहराध्यक्ष सोहेल तांबोळी, युवती अध्यक्षा स्नेहा शिंदे, चित्रा शिंदे, महिला तालुकाध्यक्ष ढोले ताई हे उपस्थित होते.