पिंपरी-चिंचवडसाठी अभिमानाची बाब! वैद्य निलेश लोंढे ‘निमा आयुर्वेद फोरम’चे राष्ट्रीय अध्यक्ष..

- Advertisement -spot_img

या निवडीने देशभरातील आयुर्वेद डॉक्टरांना लाभले एक सक्षम नेतृत्व..

भोसरी: पिंपरी-चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. येथील निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलचे संचालक वैद्य निलेश लोंढे यांची नुकतीच ‘निमा आयुर्वेद फोरम’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. आयुर्वेद आणि युनानी चिकित्सा प्रणाली क्षेत्रातील देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्था असलेल्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) या फोरमची स्थापना केली आहे आणि पहिल्या अध्यक्षपदाचा मान वैद्य लोंढे यांना मिळाला आहे.

वैद्य निलेश लोंढे यांनी यापूर्वी महाराष्ट्र आयुर्वेद प्रचार प्रसार समितीचे चेअरमन म्हणून दोन वर्षे यशस्वी कार्यभार सांभाळला आहे. या काळात त्यांनी आयुर्वेद डॉक्टरांच्या अनेक समस्यांसाठी आवाज उठवला. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापजी जाधव, आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा, NCSIM अध्यक्ष जयंत देवपुजारी, NCSIM Ethics कमिटी अध्यक्ष राकेश शर्मा, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि आयुष संचालक घुंगराळे यांच्यासोबत वेळोवेळी बैठका घेऊन त्यांनी आयुर्वेद डॉक्टरांच्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न केला.

आयुर्वेदाला विमा (Insurance) सुविधा मिळवून देणे, केंद्रीय कर्मचारी आरोग्य सेवा (CGHS) आणि माजी सैनिक आरोग्य सेवा (ECHS) मध्ये आयुर्वेद उपचारांचा समावेश करणे यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यासोबतच, आयुर्वेद वैद्यांच्या क्लिनिक आणि हॉस्पिटल रजिस्ट्रेशन, डे केअर इन्शुरन्स सुविधा, तसेच ‘आयुर्वेद’ आणि ‘पंचकर्म’ हे शब्द केवळ नोंदणीकृत (Registered) आयुर्वेद डॉक्टरांनीच वापरावेत यासाठी कायदा करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. क्रीडा (Sports) आणि औद्योगिक आरोग्य सेवेमध्ये आयुर्वेदाचा समावेश व्हावा, यासाठीही ही संघटना सक्रियपणे काम करणार आहे.

नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष वैद्य निलेश लोंढे यांना निमा सेंट्रल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी आणि इतर सदस्यांचे मार्गदर्शन मिळत राहणार आहे. त्यांच्या या निवडीमुळे देशभरातील आयुर्वेद डॉक्टरांना एक सक्षम नेतृत्व लाभले आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी ही निश्चितच गौरवाची बाब आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा