जामखेड तालुक्यात बळीराजाने आत्यल्प पावसावरच केली पेरणी.

- Advertisement -spot_img

जामखेड तालुक्यात बळीराजाने आत्यल्प पावसावरच केली पेरणी.

काही भागात पावसाअभावी पेरणी खोळंबली; खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता.

जामखेड प्रतिनिधी
जुन महिना संपला तरी जामखेड तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मागील आठवड्यात तालुक्यातील काही भागात झालेल्या आत्यल्प पावसावरच अनेक शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली असून आता पिकांच्या उगवणीसाठी ते आकाशाकडे आशेने नजर लावून बसले आहेत. तर दुसरीकडे, अनेक भागांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने पेरणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.

पेरणी झालेल्या पिकांनाही पावसाची प्रतीक्षा

तालुक्यातील काही भागात झालेल्या तुरळक पावसाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी यांसारख्या पिकांची पेरणी केली आहे. मात्र पेरणीनंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने या पिकांच्या उगवणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जमिनीतील ओलावा कमी होत चालल्याने शेतकरी चिंतेत असून येत्या काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खत-बियाणांच्या वाढत्या दरांमुळे शेतकरी हवालदिल
यंदाच्या हंगामात खत व बियाणांच्या दरांनी उच्चांक गाठल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोठा आर्थिक भार सहन करत अनेकांनी पेरणी केली असली तरी पावसाची अनिश्चितता कायम असल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

पुरेसा पाऊस झाल्यासच पिकांना जीवदान मिळून खर्चाची भरपाई होऊ शकते. अन्यथा केलेली गुंतवणूक वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
हवामानातील अनिश्चितता आणि पावसाचा खंड यामुळे जामखेड तालुक्यातील खरीप हंगाम सध्या धोक्याच्या छायेत असून बळीराजाचे लक्ष आता येणाऱ्या पावसाकडे लागून राहिले आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा