रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे आणखी एका निष्पाप युवकाचा बळी.

- Advertisement -spot_img

रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे आणखी एका निष्पाप युवकाचा बळी.

भरधाव पिकअपच्या धडकेत सिद्धेश्वर म्हेत्रे यांचा मृत्यू;
नागरिकांमध्ये संताप.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड–सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम, शहरातील वाढते अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी यामुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही.

या गंभीर परिस्थितीमुळे अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला असून, अनेक जण कायमचे अपंगत्व घेऊन जगत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक व जीवितहानी होत असताना प्रशासन मात्र उदासीन असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

काल रात्री मुंढे हॉस्पिटलसमोर सिद्धेश्वर म्हेत्रे हे युवक आपल्या मोटारसायकलसह उभे असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सिद्धेश्वर यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे जामखेड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे काम दीर्घकाळापासून रखडलेले असताना तसेच शहरातील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांनंतरही संबंधित विभाग आणि प्रशासन आवश्यक उपाययोजना का करत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने वाहतुकीची समस्या अधिक गंभीर बनली असून, त्यातून वारंवार अपघात घडत आहेत. मात्र या प्रश्नावर प्रभावी तोडगा काढण्याऐवजी राजकीय नेत्यांमध्ये श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
“रस्त्याचे काम पूर्ण झाले असते आणि अतिक्रमणांवर वेळीच कारवाई झाली असती, तर अनेकांचे जीव वाचले असते,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. सिद्धेश्वर म्हेत्रे यांच्या मृत्यूनंतर तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी जागे होऊन रखडलेल्या महामार्गाच्या कामाला गती द्यावी, तसेच शहरातील अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी मागणी जामखेडकरांकडून होत आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा