नगरपरिषदेचे कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी मी कटिबद्ध आहे:मुख्याधिकारी अजय साळवे..

- Advertisement -spot_img

अजय साळवे यांची वर्ग-१ मुख्याधिकारीपदी पदोन्नती; जामखेड नगरपरिषदेचा पुन्हा कार्यभार

कर्मचारी संघटनेकडून सत्कार, भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव

जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांची मुख्याधिकारी वर्ग-२ पदावरून मुख्याधिकारी वर्ग-१ पदावर पदोन्नती झाली असून, महाराष्ट्र शासनाने त्यांच्याकडे पुन्हा जामखेड नगरपरिषदेचा कार्यभार सोपविला आहे.

या पदोन्नतीबद्दल जामखेड नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

अजय साळवे यांनी जामखेड नगरपरिषदेत कार्यरत असताना विविध विकासकामे, प्रशासकीय सुधारणा तसेच नागरिकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबवून आपली स्वतंत्र कार्यशैली निर्माण केली आहे. त्यांच्या कामकाजाची दखल घेत शासनाने त्यांना मुख्याधिकारी वर्ग-१ पदावर पदोन्नती देत पुन्हा जामखेड नगरपरिषदेची जबाबदारी सोपविली आहे.

यावेळी आयोजित सत्कार समारंभात कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साळवे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेची प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला. कर्मचारी व प्रशासन यांच्यात समन्वय राखत विकासाभिमुख निर्णय घेण्याची त्यांची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले, “शासनाने माझ्यावर दाखविलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे. जामखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि नगरपरिषदेचे कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने शहराच्या विकासाला अधिक गती देण्याचा प्रयत्न राहील.”
या प्रसंगी नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी अजय साळवे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा