हसत-खेळत योगाचा संस्कार; श्री नागेश संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात
जामखेड, प्रतिनिधी :
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय, कन्या विद्यालय जामखेड व सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (२१ जून) आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी, एनसीसी कॅडेट, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमात योग प्रशिक्षक जितेंद्र बोरा यांनी प्राणायाम, विविध योगासने व त्यांचे आरोग्यदायी फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी हसत-खेळत पद्धतीने विद्यार्थ्यांकडून योगाभ्यास करून घेतल्याने विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. क्रीडा शिक्षक आबा जायगुडे यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करून दाखवले.

यावेळी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर, विनायक राऊत, प्रकाश सदाफुले, कुंडल राळेभात, प्राचार्य बी. के. मडके, मुख्याध्यापिका आर. आर. भोर, पर्यवेक्षक एस. व्ही. जाधवर, सुग्रीव ठाकरे, संतोष भोंडवे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी, एनसीसी कॅडेट आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

स्कूल कमिटी सदस्य विनायक राऊत यांनी योग दिनाचा इतिहास सांगत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कुंडल राळेभात यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद करून नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी योग प्रतिज्ञा घेतली. एनसीसी अधिकारी मयूर भोसले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी. के. मडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका आर. आर. भोर यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण झाली असून निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.


