मंदिरासमोर किरकोळ वादातून रक्तरंजित हल्ला; तरुण अतिदक्षता विभागात
नारळ फोडण्याचा दगड डोक्यात घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
खर्डा रोडवरील बटेवाडी शिवारातील मारुती मंदिरासमोर मोटारसायकल पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या हल्ल्यात मुकुंद रघुनाथ पोकळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
याबाबत शिवाजी मधुकर मोरे (रा. पोकळेवस्ती, जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १५ जून २०२६ रोजी ते आणि त्यांचे मित्र मुकुंद पोकळे हे देवदैठण येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परत येताना त्यांनी बटेवाडी शिवारातील मारुती मंदिराजवळ दर्शनासाठी मोटारसायकल थांबवली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या बाळू उर्फ दिपक मनोहर खरात (रा. बटेवाडी) याने मोटारसायकल येथे का लावली, असा जाब विचारत वाद घातला.
फिर्यादीनुसार, आरोपीने मोटारसायकलची चावी काढून वाहन खाली पाडले. त्यामुळे मुकुंद पोकळे खाली पडले. त्यानंतर आरोपीने मंदिराजवळील नारळ फोडण्याचा दगड उचलून मुकुंद यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला.
दरम्यान, मित्राला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या शिवाजी मोरे यांनाही आरोपीने त्याच दगडाने मारहाण केली. त्यांच्या डोक्यावर, खांद्यावर व पायावर मार लागून त्यांनाही दुखापत झाली.

जखमी अवस्थेत असलेल्या मुकुंद पोकळे यांच्या डोक्यावर स्वतःचा शर्ट बांधून शिवाजी मोरे यांनी त्यांना जामखेड येथील पवार हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

प्राथमिक उपचारानंतर मुकुंद यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. सध्या ते अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी शिवाजी मोरे यांच्या फिर्यादीवरून बाळू उर्फ दिपक मनोहर खरात याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपीने पोलीसांत तक्रार केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून किरकोळ कारणावरून होत असलेल्या हिंसक घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत कन्हेरे करीत आहेत.
चौकट
मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर हल्ला दर्शनासाठी थांबलेल्या दोन मित्रांवर मंदिर परिसरातच जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. धार्मिक स्थळांच्या परिसरात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



