वारकरी भुषण कैलास महाराज भोरे यांच्या किर्तनाने अधिक मासानिमित्त जमादारवाडी येथील धार्मिक उपक्रमांची सांगता..

- Advertisement -spot_img

अधिक मासानिमित्त जमादारवाडी येथे धार्मिक उपक्रमांची सांगता..

पहाटेच्या काकडा आरती भजनाने महिनाभर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

जामखेड प्रतिनिधी :
अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त जमादारवाडी येथे ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक उपक्रमांची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. अधिक मासाच्या प्रारंभापासून दररोज पहाटे काकडा आरती व भजनाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे संपूर्ण गाव धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाने भारावून गेले होते.

अधिक मास हा हिंदू धर्मामध्ये विशेष पुण्यप्रद मानला जात असल्याने या कालावधीत प्रत्येक कुटुंबात धार्मिक संस्कार रुजावेत, भाविकांना पुण्यसंचयाची संधी मिळावी आणि समाजात अध्यात्मिक जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने ग्रामस्थांनी एकत्र येऊन हा उपक्रम हाती घेतला होता.

गेल्या महिनाभर दररोज पहाटे चार वाजता काकडा आरती व भजनाचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थ, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदविला.
या धार्मिक उत्सवाचा समारोप सोमवार, दि. १५ रोजी वारकरी भूषण ह.भ.प. कैलास महाराज भोरे यांच्या कीर्तनाने झाला.

यावेळी महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील –
“तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ ।कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी ॥”
या ओळींवर सखोल निरूपण करत भक्ती, नम्रता आणि ईश्वरभक्तीचे महत्त्व विशद केले. तसेच परमार्थिक साधना, समाजातील एकोपा आणि मानवी मूल्ये जपण्याचे आवाहन केले.कैलास महाराज भोरे यांनी आपल्या कीर्तनात भेदाभेद, जात-पात आणि मतभेद विसरून समाजहितासाठी एकत्र येण्याचा संदेश दिला. आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर राखावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.

तसेच जमादारवाडी ग्रामस्थांकडून सातत्याने धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे गावात बंधुभाव, एकोपा आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कीर्तनसेवेनंतर ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील अनेक भाविकांनी उपस्थिती लावली. अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक उपक्रमामुळे जमादारवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांच्या धार्मिक एकतेचे दर्शन घडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा