पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले,गटारे व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे:नगरसेवक संजय(काका) काशिद
मान्सूनपूर्व सफाई मोहिमेला वेग. जमादारवाडीत नाली खोलीकरण व स्वच्छता.
जामखेड प्रतिनिधी
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जामखेड नगरपरिषदेच्या वतीने शहरात मान्सूनपूर्व स्वच्छता व नालेसफाई मोहिमेला गती देण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत जमादारवाडी परिसरात नाली खोलीकरण व साफसफाईचे काम हाती घेण्यात आले.

जमादारवाडी येथील आण्णा नेटके यांच्या घरापासून नदीपात्रापर्यंत असलेल्या नालीचे जेसीबीच्या सहाय्याने खोलीकरण व गाळ काढण्याचे काम करण्यात आले.

तसेच परिसरातील साचलेला कचरा व झाडाझुडपांची साफसफाई करून पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. याशिवाय मारुती मंदिर परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या कामांची पाहणी नगरसेवक मोहन पवार, नगरसेवक संजय (काका) काशीद तसेच जामखेड नगरपरिषदेचे शेख यांनी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मान्सून काळात पाणी तुंबणे, डासांची उत्पत्ती व साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने विविध भागांत नाले, गटारे आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे स्वागत करत परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व प्रमुख नाले, गटारे व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता पूर्ण करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी बोलताना नगरसेवक संजय (काका) काशीद म्हणाले,की
“पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले, गटारे व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणे ही नगरपरिषदेची प्राथमिक जबाबदारी आहे. जमादारवाडी परिसरातील नाली खोलीकरण व साफसफाईमुळे पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यास मदत होणार असून नागरिकांना पाणी तुंबण्याच्या समस्येपासून दिलासा मिळेल. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून मान्सूनपूर्व सर्व आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे. नागरिकांनीही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे,व कुठे समस्या जाणवली तर आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले.”
यावेळी त्यांच्यासमवेत जमादारवाडी ग्रामस्थ तसेच नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


