इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवल्यास देश-विदेशात करिअरच्या संधी उपलब्ध:प्रा मधुकर(आबा) राळेभात
फिनिक्स इंग्लिश क्लासचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न.
जामखेड प्रतिनिधी
इंग्रजी भाषा ही ज्ञानाचे आणि संधींचे दार उघडणारी भाषा असून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर इंग्रजीवर प्रभुत्व मिळविल्यास देश-विदेशात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.

फिनिक्स इंग्लिश क्लासमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडत असून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.
रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी फिनिक्स इंग्लिश क्लासच्या वतीने आयोजित निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत मनोगत व्यक्त करून मान्यवरांचे स्वागत केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मधुकर राळेभात, दैनिक सुर्योदयचे उपसंपादक धनराज पवार, अर्जुन लोंढे, शहाजी हुलगुंडे, प्रा. दशरथ चौधरी, प्रा. आरती राळेभात यांची उपस्थिती होती. यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा. राळेभात म्हणाले की, जगातील बहुतांश ज्ञान इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात करणे आवश्यक आहे. परिस्थितीची कारणे न देता अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश निश्चित मिळते.
फिनिक्स इंग्लिश क्लासचे संचालक प्रा. दशरथ कोळेकर यांनी प्रास्ताविकात क्लासच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी अवघ्या चार-पाच विद्यार्थ्यांपासून क्लासची सुरुवात झाली होती. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास यामुळे आज क्लासमध्ये ३०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच १५ ते २० गावांमधून विद्यार्थी इंग्रजी प्रशिक्षणासाठी येथे येतात. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, समर व्हेकेशन बॅच आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रमही राबविले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया कार्ले व श्रेया अडाले यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैष्णवी भोंडवे यांनी मानले.



