आजही शिंदे बंधू जोपासत आहेत शिवकालीन कला.
“बोटांवरील बाराखडी” या दुर्मिळ कलेला शासनाने आभय द्यावे : दादासाहेब शिंदे
जामखेड प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या काळात गुप्त संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाणारी “बोटांवरील बाराखडी” ही दुर्मिळ आणि ऐतिहासिक कला आजही शेवगाव तालुक्यातील शिंदे बंधू जतन करत आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लोप पावत चाललेल्या या कलेचे सादरीकरण करून दादासाहेब शिंदे आणि चंद्रकांत शिंदे हे बंधू आपल्या पूर्वजांची परंपरा जिवंत ठेवण्याचे कार्य करत आहेत.
इतिहासात स्वराज्याच्या गुप्तहेर यंत्रणेत या कलेला विशेष महत्त्व होते. शत्रूच्या हालचालींची माहिती पोहोचविणे, सैन्याला इशारे देणे आणि गुप्त संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी बोटांच्या विशिष्ट संकेतांचा वापर केला जात असे. तान्हाजी मालुसरे आणि बहिर्जी नाईक यांसारख्या पराक्रमी सेनानींनी या कलेचा प्रभावी वापर केल्याचे सांगितले जाते.

सध्या शिंदे बंधू या कलेचे विविध ठिकाणी प्रात्यक्षिक सादर करतात. या सादरीकरणात एक कलाकार संबळ आणि तुणतुणे वाजवत काही अंतरावर उभा असतो, तर दुसरा कलाकार बाणा-साज परिधान करून बोटांच्या संकेतांद्वारे संदेश देतो. वादक त्या संकेतांचे विश्लेषण करून उपस्थितांना त्याचा अर्थ सांगतो. त्यामुळे ही कला पाहणाऱ्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरते.

याबाबत बोलताना दादासाहेब शिंदे यांनी सांगितले की, “आमच्या अनेक पिढ्या ही कला जतन करत आल्या आहेत. मात्र आजच्या काळात या कलेला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने आमच्या पुढील पिढीचा या क्षेत्राकडे कल कमी होत आहे. शासनाकडून कलाकार म्हणून कोणत्याही प्रकारची विशेष मदत मिळत नसल्याने उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे.”
ते पुढे म्हणाले की, गोंधळी समाज शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांपासून वंचित राहिला आहे.

या समाजाची स्वतंत्र जनगणना करून त्यांच्या कला आणि कलाकारांना संरक्षण देण्याची गरज आहे. तसेच स्वराज्यासाठी बलिदान देणारे आणि या कलेचा प्रभावी वापर करणारे तान्हाजी मालुसरे व बहिर्जी नाईक यांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीसमोर आणण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत.

एकेकाळी स्वराज्याच्या संरक्षणासाठी उपयुक्त ठरलेली ही कला आज अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करत आहे. अशा परिस्थितीत शासन, सांस्कृतिक संस्था आणि समाजाने पुढाकार घेऊन या दुर्मिळ लोककलेचे जतन व संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.


