जामखेडमध्ये श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी
श्री शिव राज्याभिषेक उत्सव समिती, जामखेड तालुक्याच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही हिंदवी स्वराज्य दिनानिमित्त भव्य श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवशके ३५३ प्रारंभानिमित्त ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून मंगळवार दि. २३ जून ते शनिवार दि. २७ जून २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

सोहळ्याची सुरुवात मंगळवार दि. २३ जून रोजी रात्री ७ ते ९ या वेळेत विनोद सम्राट ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे (नेवासा) यांच्या कीर्तनाने होणार आहे. बुधवार दि. २४ जून रोजी भागवताचार्य ह.भ.प. समाधान महाराज शर्मा (केज) यांचे कीर्तन होईल. गुरुवार दि. २५ जून रोजी रात्री ७ ते ९ या वेळेत गौरव महाराष्ट्राचा शिवशाहीर पृथ्वीराज माळी (सांगली) यांचा शिवचरित्रावर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शुक्रवार दि. २६ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून रात्री ७ ते ९ या वेळेत कीर्तन चंद्रिका ह.भ.प. रोहिणीताई महाराज परांजपे-माने (पुणे) यांचे कीर्तन होणार आहे.

शनिवार दि. २७ जून रोजी पहाटे ५ वाजता सप्तनद्या, गडकोट, किल्ले व तीर्थक्षेत्र येथून आणलेल्या पवित्र जलाने शिवछत्रपतींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे. तसेच दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी जामखेड शहरातून भव्य शिवराज्याभिषेक मिरवणूक काढण्यात येणार आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, तहसील कार्यालयासमोर या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिव राज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


