छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक : नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी
जामखेड नगरपरिषदेच्या वतीने जयंतीनिमित्त अभिवादन; समता व शिक्षणाचा संदेश अधोरेखित
जामखेड प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजातील वंचित, दुर्बल आणि मागास घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून सामाजिक समतेचा विचार रुजविला. आरक्षणाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांना आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाते, असे प्रतिपादन जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेड नगरपरिषदेच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी पुढे सांगितले की, शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि समान संधी या मूल्यांचा पुरस्कार करत सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे असून नव्या पिढीने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करण्याची गरज आहे.

जामखेड नगरपरिषदेच्या वतीने विविध महापुरुषांच्या जयंती उत्सवांचे नियमित आयोजन करण्यात येत असून, त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष पोपट(नाना) राळेभात, मुख्याधिकारी अजय साळवे नगरसेवक,प्रविण सानप, विकी घायतडक, अर्जुन म्हेत्रे, नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



