रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा फटका; जामखेड नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर पावसाचे पाणी साचले..

- Advertisement -spot_img

रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा फटका; जामखेड नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर पावसाचे पाणी साचले..

प्रशासनाची तातडीची कारवाई; जेसीबीद्वारे निचरा करून मुरूम भरत गैरसोय दूर..

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे आणि बंद झालेल्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे अवघ्या अल्पशा पावसातच जामखेड नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते परिणामी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषदेचे कर्मचारी यांना साचलेल्या पाण्यातूनच ये-जा करावी लागल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली होती. मात्र या परिस्थितीची दखल घेत नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवत पाण्याचा निचरा करून प्रवेशद्वार परिसरातील अडचण दूर केली.

महावितरण कार्यालय बीड रोड परिसराच्या पाठीमागील रस्ता तसेच बाजारतळ भागातील पावसाचे पाणी नगरपरिषदेसमोरील राष्ट्रीय महामार्गालगतच्या ड्रेनेज लाईनमधून वाहून जाते. मात्र राष्ट्रीय महामार्गाचे काम दीर्घकाळापासून रखडलेले असल्याने आणी अतिक्रमणामुळे गटारांचा प्रवाह अडथळाग्रस्त झाला आहे. त्यामुळे काल झालेल्या पावसानंतर पाण्याचा निचरा न होता ते नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर साचले.

नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ हालचाल करत जेसीबीच्या सहाय्याने साचलेल्या पाण्याचा निचरा केला. तसेच सखल भागात मुरूम व कच भरून परिसर समतल करण्यात आला. भविष्यात अशा प्रकारची समस्या निर्माण होऊ नये यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात काही भागांमध्ये पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली असून त्यावर उपाययोजनांची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

“जामखेड नगरपरिषदेच्या वतीने सभापती प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विकासकामांचे नियोजन सुरू आहे मान्सून पूर्व आढावा बैठक घेऊन आम्ही सर्व प्रभागात पहाणी करून उपाययोजना सुरू केल्या आहेत जामखेडच्या मायबाप
जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू.”

“प्रांजल चिंतामणी नगराध्यक्षा
(जामखेड नगरपरिषद)

“नगरपरिषदेच्या वतीने मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी ज्या प्रभागांमध्ये अडचणी निर्माण होत असतील, तेथील नागरिकांनी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच शहर आणि उपनगर परिसरात वृक्षारोपण व संवर्धनासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.”

पोपट(नाना) राळेभात
(उपनगराध्यक्ष नगरपरिषद जामखेड)

“शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना आणि मलनिस्सारण प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पावसाचे पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते.याची प्रशासनाला पूर्ण जाणीव असून संभाव्य अडचणी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची तयारी करण्यात येत आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे.”
अजय साळवे
(मुख्याधिकारी नगरपरिषद जामखेड)

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पाणी साचल्याने ड्रेनेज व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाकडे संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा