जामखेडच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाला गती
कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश
नागरिकांना लवकरच मिळणार स्वच्छ पाणी व सक्षम ड्रेनेज व्यवस्था.
भूसंपादन, जलवाहिनी व जलशुद्धीकरण केंद्राच्या कामांचा प्रशासकीय आढावा
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेली पाणीपुरवठा योजना तसेच मलनिस्सारण (ड्रेनेज) प्रकल्पाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया, जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी आणि उर्वरित जलवाहिनीची कामे प्राधान्याने पूर्ण करून नागरिकांना लवकरात लवकर सुविधांचा लाभ मिळवून द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जामखेड नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेबाबत आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, नगराध्यक्षा सौ. प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, मुख्याधिकारी अजय साळवे, नगरसेवक प्रविण सानप, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत करमाळा येथून जामखेडकडे येणाऱ्या जलवाहिनीच्या उर्वरित कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वनविभागाच्या परवानगीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून उर्वरित १२ किलोमीटर जलवाहिनीचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मुख्य बाजारपेठेतील जलवाहिनीच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे सांगण्यात आले. खर्डा चौक ते बीड कॉर्नर या मुख्य मार्गावरील कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेण्याचे निर्देशही देण्यात आले.

पावसाळ्यात शहरातील पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी सिमेंट रस्ते व पावसाळी गटार योजनांचा एकात्मिक आराखडा तयार करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. रस्ते व गटारींची कामे एकत्रितपणे पूर्ण झाल्यास शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होऊन नागरिकांना दीर्घकालीन लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
मलनिस्सारण योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जामवाडीसह विविध भागांतील रस्त्यांवर आवश्यकतेनुसार मुरूम व खडी टाकून वाहतूक सुरळीत ठेवावी. पावसाळ्यानंतर या रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण करण्यात यावे, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.
जलशुद्धीकरण केंद्रासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेची मोजणी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून तांत्रिक आराखडा अंतिम करावा व आवश्यक पंपांच्या निविदा प्रक्रियेलाही गती द्यावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून विकासकामांना वेग द्यावा आणि आवश्यक निधीसाठीचे प्रस्ताव वेळेत सादर करावेत, जेणेकरून जामखेड शहराचा सर्वांगीण विकास अधिक गतीने साधता येईल, असे प्रा. राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

चौकट : विकासकामांसाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा
जामखेड नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनांना गती देण्यासाठी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या दोन्ही योजना पूर्ण झाल्यानंतरच शहरातील रस्ते व इतर विकासकामांना मोठ्या प्रमाणावर मंजुरी मिळणार आहे. नागरिकांना दिलेला विकासाचा शब्द पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असून आगामी सर्व विकासकामांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. प्रांजल चिंतामणी यांनी केले.


