वारकऱ्यांच्या सेवेसाठी रामेश्वर हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम..
संत ज्ञानेश्वर संस्थान भवरवाडी-पंढरपूर पायी दिंडीतील ३०० वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप.
जामखेड प्रतिनिधी
आषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत ज्ञानेश्वर संस्थान भवरवाडी (ता. पाटोदा) येथील पायी दिंडीतील वारकऱ्यांसाठी जामखेड येथील रामेश्वर हॉस्पिटल व आय.सी.यु. सेंटरच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचा सुमारे अडीचशे ते तीनशे वारकऱ्यांनी लाभ घेतला.

जामखेड तालुक्यातील नान्नज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी (दि. १८ जुलै) सकाळी ७ वाजता हे आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. रामेश्वर हॉस्पिटल व आय.सी.यु. सेंटरचे संचालक डॉ. सचिन काकडे, डॉ. रूपाली काकडे आणि डॉ. भूपेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले.
वारी हा केवळ अध्यात्माचा नव्हे तर सेवाभावाचाही उत्सव आहे. याच भावनेतून वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दिंडीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार गोळ्या व औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
यावेळी दिंडीच्या संचालिका ह.भ.प. भागवताचार्य कांताताई महाराज सोनटक्के, ह.भ.प. महावीर महाराज घुले, नान्नज सेवा सोसायटीचे चेअरमन उदय पवार, चोबेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच जनक सावंत, जगदीश भाकरे तसेच वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. दादासाहेब सावंत यांच्या नेतृत्वाखाली डॉ. भरत सावंत, डॉ. नागेश वराडे, रामेश्वर हॉस्पिटलचे व्यवस्थापक जयसिंग उगले, आरोग्य मित्र उमेश घोडेस्वार, सुमित ढोले, पृथ्वीराज उगले, सुरज पवार, वैभव मिसाळ तसेच परिचारिका कविता मते व सोनाली गोपाळघरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

चौकट
अनेक अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रामेश्वर हॉस्पिटल
जामखेड शहरातील रामेश्वर हॉस्पिटल व आय.सी.यु. सेंटर हे तालुक्यातील एक विश्वासार्ह आणि अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देणारे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. येथे हृदयरोग, सर्पदंश, विषबाधा, मधुमेह, जनरल सर्जरी, प्रसुती सेवा, अतिदक्षता विभाग (ICU), सिटीस्कॅन, सोनोग्राफी आदी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ रुग्णांना येथे मिळत आहे.
– जयसिंग उगले
व्यवस्थापक, रामेश्वर हॉस्पिटल व आय.सी.यु. सेंटर, जामखेड



