मतदार यादी पुनर्निरीक्षणासाठी जामखेड शहरात विशेष कॅम्पचे आयोजन.

- Advertisement -spot_img

मतदार यादी पुनर्निरीक्षणासाठी जामखेड शहरात विशेष कॅम्पचे आयोजन

आधारकार्ड, ओळखपत्र व फोटोसह केंद्रावर हजर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन..
जामखेड प्रतिनिधी
भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत जामखेड शहरातील प्रत्येक मतदार केंद्रावर विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ (Booth Level Officer) व दोन सहकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून मतदार नोंदणी, दुरुस्ती व पडताळणीचे काम सुरू आहे.

प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आपल्या मतदार यादीतील नावे तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्रावर येताना आधारकार्ड, ओळखपत्र आणि अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यावेळी बोलताना जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले की, “मतदार यादी अचूक व अद्ययावत ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नागरिकांनी आपल्या नावाची खातरजमा करून आवश्यक असल्यास दुरुस्ती, नाव समाविष्ट करणे अथवा अन्य बदलांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.”

तर जामखेडचे तहसीलदार धनंजय बांगर यांनी सांगितले की, “३० जून ते २९ जुलै या कालावधीत भारतीय निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनर्निरीक्षणासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. बीएलओ व कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती संकलित करत असून नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे.”

दरम्यान, प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून शहरातील विविध मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना फॉर्म भरण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व स्वयंसेवकांकडून मदत करण्यात येत आहे. मतदार यादी अधिक अचूक आणि परिपूर्ण करण्यासाठी नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार धनंजय बांगर व मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केले आहे..

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा