“वाढदिवस साजरा करायचा तर असा!” पर्यवेक्षक सुदाम वराट यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप
जामखेड प्रतिनिधी
वाढदिवसाच्या दिवशी अनावश्यक खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श ल. ना. होशिंग माध्यमिक विद्यालय, जामखेड येथील पर्यवेक्षक सुदाम वराट यांनी घालून दिला आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी श्री साकेश्वर विद्यालय, साकत येथील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेशाचे वाटप करून समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.

श्री सुदाम वराट यांनी गेली २८ वर्षे श्री साकेश्वर विद्यालय, साकत येथे सहशिक्षक म्हणून प्रामाणिक सेवा बजावली आहे. नुकतीच त्यांची ल. ना. होशिंग माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे पर्यवेक्षक पदावर बढती झाली आहे. ते माध्यमिक शिक्षक संघटना, जामखेडचे तालुकाध्यक्ष तसेच जामखेड मीडिया क्लबचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत असून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत आहेत.

दरवर्षी वाढदिवस केक कापून साजरा करण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. यंदाही त्यांनी ही परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, लेखन साहित्य आणि गणवेशाचे वाटप केले. “शिक्षणासाठी कोणतेही मूल मागे राहू नये” हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केले.

यावेळी श्री साकेश्वर विद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. वाढदिवसानिमित्त तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांनी सुदाम वराट यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.
कार्यक्रमास उपसरपंच राजाभाऊ वराट, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीराम मुरूमकर, पोलीस महादेव वराट, मुख्याध्यापक भरत लहाने, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, मुकूंद वराट, प्रसाद होशिंग, लहाने मॅडम, अतुल दळवी, आण्णा विटकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी सुदाम वराट यांच्या कार्याचे कौतुक करत, “असे शिक्षकच खऱ्या अर्थाने समाजाचे शिल्पकार असतात,” अशा भावना व्यक्त केल्या. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळख असलेल्या वराट यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती व विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनामुळे विविध संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
सुदाम वराट यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे ‘वाढदिवस म्हणजे केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाला काहीतरी देण्याची संधी आहे’ हा संदेश तालुकाभर पोहोचला असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



