राष्ट्रमाता जिजाऊ स्मृतीज्योत रथयात्रेचे जामखेडमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत..

- Advertisement -spot_img

राष्ट्रमाता जिजाऊ स्मृतीज्योत रथयात्रेचे जामखेडमध्ये जल्लोषात स्वागत

जिजाऊंचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी; सर्वसमावेशक स्वराज्याची पायाभरणी जिजाऊंनी केली – मान्यवरांचे प्रतिपादन

जामखेड | प्रतिनिधी
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉं साहेब यांच्या ३५३ व्या पुण्यतिथीनिमित्त सिंदखेडराजा ते पाचाड या ऐतिहासिक स्मृतीज्योत रथयात्रेचे जामखेड शहरात सोमवारी शिवभक्तांच्या उत्स्फूर्त “जय जिजाऊ जय शिवाराय” जयघोषात व मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.

स्वागत समारंभात बोलताना जिजाऊंचे वंशज भागवत राजे जाधव म्हणाले, “राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेब यांनी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याचा संकल्प प्रत्यक्षात साकार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वामागे जिजाऊंचे संस्कार, दूरदृष्टी आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण होती. त्यांनी स्वराज्याची भक्कम पायाभरणी करत समाजात स्वाभिमान जागवला.”

प्रा. मधुकर आबा राळेभात यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “राष्ट्रमाता जिजाऊ यांनी या देशाला दोन छत्रपती दिले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपाने त्यांनी आदर्श नेतृत्व घडवले. त्यांच्या विचारांमुळे हिंदवी स्वराज्याची संकल्पना साकार झाली आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळाली.”

नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या, “गुलामगिरी, अन्याय आणि अत्याचाराविरोधात धैर्याने लढण्याची प्रेरणा राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेब यांच्या जीवनातून मिळते. स्त्रीशक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक समतेचा संदेश देणारे त्यांचे कार्य आजही समाजासाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांचे जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.”


माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी काका राळेभात म्हणाले, “सिंदखेडराजा ते पाचाड ही ऐतिहासिक स्मृतीज्योत रथयात्रा जामखेड शहरातून जात असल्याने हा प्रत्येक जामखेडकरासाठी अभिमानाचा आणि भाग्याचा क्षण आहे. या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेब यांच्या विचारांचा व कार्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहे.”

यावेळी प्रा. मधुकर आबा राळेभात, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी काका राळेभात, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, मराठा सेवक अवधूत पवार,नगरसेविका नंदाताई होळकर, सिमाताई कुलकर्णी, सुमनताई शेळके, नगरसेवक मोहन पवार, पवन राळेभात, मनोज कुलकर्णी, राजेंद्र गोरे, वसीम सय्यद, प्रशांत राळेभात, कॅप्टन भोरे,तात्यासाहेब बांदल,गुलाब जांभळे, विनायक राऊत, हरिभाऊ आजबे, अमित जाधव, कुंडल राळेभात, संभाजी मुळे, संभाजी ढोले, डॉ. भरत देवकर, सागरशेठ अंदुरे, प्रविण उगले, अनिल अडाले, सचिन शिंदे, बजरंग सरडे, गणेश हागवणे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेब यांच्या स्मृतीज्योत रथयात्रेच्या स्वागतामुळे जामखेड शहर शिवमय झाले असून, जिजाऊंच्या विचारांचा जागर आणि स्वराज्याच्या संस्कारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा