रिमझिम पावसाने खरीप पिकांना दिले जिवदान; बळीराजाला दिलासा.

- Advertisement -spot_img

रिमझिम पावसाने खरीप पिकांना दिले जिवदान; बळीराजाला दिलासा

जुलैचा पहिला आठवडा संपला तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम; नदी-नाले अद्याप कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद..

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पेरणी झालेल्या खरीप पिकांना काही दिवसांसाठी जिवदान मिळाले आहे.

तालुक्यातील अनेक भागांत मागील आठवड्यातच शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उगवलेल्या पिकांच्या वाढीबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

गेल्या दोन दिवसांत टप्प्याटप्प्याने झालेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळाला असून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे उगवलेल्या पिकांची वाढ होण्यास मदत होणार असली तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.

त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान, जुलै महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही तालुक्यात एकही दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी नदी, नाले आणि ओढे अद्याप कोरडेच असून पाणीसाठ्यांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. ग्रामीण भागात तसेच काही शहरी भागात पाणीटंचाईची समस्या कायम असून नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली असली तरी शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता दमदार पावसाकडे लागले आहे. खरीप हंगामाचे भवितव्य आणि पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासाठी चांगल्या पावसाची नितांत आवश्यकता असल्याचे चित्र सध्या जामखेड तालुक्यात दिसून येत आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा