डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जामखेड पोलीस वसाहतीत वृक्षारोपण.
पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, उपनगराध्यक्ष पोपट (नाना) राळेभात यांची उपस्थिती; पर्यावरण संवर्धनाचा संदेश.
जामखेड प्रतिनिधी : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा शाखा अहिल्यानगर समितीच्या वतीने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त जामखेड येथील पोलीस वसाहतीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शनिवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, उपनगराध्यक्ष पोपट (नाना) राळेभात, मनोज कुलकर्णी, अंकुशराव उगले, विठ्ठल राळेभात तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते पारिजातक, चाफा, चिंच, लिंब, करंज आणि बकूळ आदी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

कार्यक्रमात बोलताना पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणासोबतच त्यांचे संवर्धन करणेही तितकेच आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान काही झाडे लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

उपनगराध्यक्ष पोपट (नाना) राळेभात यांनीही वृक्षलागवड व संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची प्रमुख जबाबदारी असल्याचे सांगितले. वाढते प्रदूषण आणि बदलते हवामान लक्षात घेता पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम जामखेड परिसरात प्रेरणादायी ठरला श्री बैठक जामखेड सदस्यांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले



