महाराष्ट्राचा मान आशियाई स्तरावर; ओम् लाड यांची ऐतिहासिक कामगिरी..
AVC Cup 2026 मध्ये भारताला कांस्यपदक; वरिष्ठ आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारे महाराष्ट्रातील पहिले व्हॉलीबॉलपटू.
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी अशी ऐतिहासिक कामगिरी आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू ओम् लाड यांनी केली आहे. भारताच्या वरिष्ठ पुरुष व्हॉलीबॉल संघाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या AVC Cup 2026 स्पर्धेत उल्लेखनीय योगदान देत भारताला कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

या यशासोबतच ओम् लाड यांच्या नावावर एक मानाचा विक्रम नोंदवला गेला आहे. वरिष्ठ गटातील आशियाई स्तरावरील स्पर्धेत पदक जिंकणारे ते महाराष्ट्रातील पहिले व्हॉलीबॉलपटू ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे राज्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ओम् लाड यांच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मा. रमेश दादा आजबे, राजुरीचे विद्यमान सरपंच सागर (भाऊ) कोल्हे तसेच डॉ.कैलास हजारे, आण्णा ढवळे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशाच्या शिखरावर पोहोचतानाही नम्रता आणि सातत्यपूर्ण मेहनत कायम ठेवण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला.

ओम् लाड यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून महाराष्ट्रातील आणि देशातील असंख्य युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.

कठोर परिश्रम, जिद्द आणि समर्पणाच्या जोरावर जागतिक स्तरावर यश संपादन करता येते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशाचा महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला सार्थ अभिमान असून भविष्यातही ते भारतीय व्हॉलीबॉलला नव्या उंचीवर नेतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



