संत वामनभाऊंच्या पालखीचे जमादारवाडी येथील गड येथे पहिले गोल रिंगण उत्साहात संपन्न
‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषात जमादारवाडीत भक्तीचा महासागर; हजारो वारकऱ्यांची उपस्थिती..
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरालगत असलेल्या जमादारवाडी येथील संत वामनभाऊ गडावर गुरुवारी संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. टाळ-मृदंग, वीणेचा निनाद, हरिनामाचा गजर आणि वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

वारकरी संप्रदायाचे मूळ उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथून मंगळवारी महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत वामनभाऊ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी, मातकुळी असा प्रवास करत ही पालखी गुरुवारी जामखेड तालुक्यात दाखल झाली.

जामखेड शहरात पालखीचे आगमन होताच तपनेश्वर येथे श्री नागेश्वर भजनी मंडळाने टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत केले. शहरातील विविध भागांत महिलांनी सडा-रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले. अनेक सामाजिक संस्था व नागरिकांनी वारकऱ्यांसाठी फळे, चहा, बिस्कीट, नाश्ता, औषधे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाप्रसाद व पंगतीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांशी संवाद साधला. पुढे जमादारवाडी येथील संत वामनभाऊ मंदिरात पालखीचे आगमन झाल्यानंतर ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांचा नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व अमित चिंतामणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर मंदिराच्या भव्य प्रांगणात गोल रिंगण सोहळ्यास सुरुवात झाली. मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला. पताकाधारी वारकरी, विणेकरी आणि टाळ-मृदंगाच्या गजरात “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल”, “गहिनीनाथ महाराज की जय” आणि “संत वामनभाऊ महाराज की जय” अशा जयघोषात पालखीभोवती प्रदक्षिणा घालत होते. या वेळी उपस्थित भाविकांनी एकच जल्लोष करत हरिनामाचा गजर केला.

रिंगण सोहळ्यात वारकरी परंपरेतील खेळिया प्रकरणातील अभंग सादर करण्यात आले. महंत विठ्ठल महाराज यांनी स्वतः अभंग गायन केले. अभंगांच्या सुरेल चालीवर वारकरी विविध पारंपरिक खेळ खेळत होते. महिला आणि पुरुष भक्तांनी फुगडीचा आनंद लुटत भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवला.
यावेळी बोलताना महंत विठ्ठल महाराज म्हणाले, “श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड हे वारकरी संप्रदायाचे मूळ स्थान आहे. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले अशी ही परंपरा आहे. दिंडीचा मार्ग अत्यंत खडतर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गाच्या विकासाची घोषणा केली असून तो लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास आहे.”
आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक या सोहळ्यास उपस्थित होते
रिंगणानंतर वारकऱ्यांसाठी नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी सारोळ्याकडे रवाना झाला..

जामखेड परिसरातून दरवर्षी अनेक दिंड्या पंढरपूरकडे जात असल्या तरी संत वामनभाऊ महाराजांचा पालखी सोहळा हा भव्य-दिव्य आणि भाविकांच्या विशेष आकर्षणाचा सोहळा मानला जातो. विशेष म्हणजे जमादारवाडी येथे होणारे हे रिंगण परिसरातील एकमेव रिंगण असून भाविकांसाठी ही दरवर्षीची मोठी आध्यात्मिक पर्वणी ठरते.


