आमदार रोहित पवार यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा द्या
‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाची मागणी
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी करत प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत रोहित पवार यांनी पत्रकार परिषदांमधून घातपाताची शक्यता व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत आ .रोहित पवार यांना उच्चस्तरीय सुरक्षा देण्याची मागणी पुढे आली आहे.

आज खर्डा पोलीस स्टेशन येथे जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांना निवेदन दिले. या निवेदनात रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या गंभीर मुद्द्यांमागील सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याचे नमूद करत, यामुळे प्रभावशाली शक्तींना धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. अजित पवारांसारख्या लोकनेत्यावर घातपात झाल्याची शंका व्यक्त होत असताना रोहित पवारांनाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली.
सदर निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे पाठविण्यात आले असून, पोलीस प्रशासनाने ते वरिष्ठ पातळीवर पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.

कार्यकर्त्यांचा इशारा: “सुरक्षा न मिळाल्यास आम्हीच कवच”
तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी सांगितले की, शासनाकडून ‘झेड प्लस’ सुरक्षा न दिल्यास राष्ट्रवादीचे तरुण कार्यकर्ते आ. रोहित पवार यांचे २४ तास संरक्षण करतील. साधारण १५ निर्भीड तरुण कार्यकर्त्यांची टीम सलग दोन दिवसांच्या रोटेशन पद्धतीने सुरक्षेची जबाबदारी स्वीकारेल. या स्वयंप्रेरित सुरक्षा व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून इच्छुक कार्यकर्त्यांकडून विचारणा होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, या उपक्रमासाठी आ.रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना परवानगी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत शासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली असून त्यासंदर्भातील निवेदन आज त्यांनी दिलं. “सत्य मांडणाऱ्या नेतृत्वाचे रक्षण ही सरकारची जबाबदारी आहे,” असे ठाम मत व्यक्त करत या मागणीमुळे जामखेड तालुक्यासह राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी श्रीकांत लोखंडे, वैभव जमकावळे, मदन पाटील, चंद्रकांत गोलेकर, गोवर्धन गायकवाड, गणेश जगताप, बिभीषण परकड, रामहरी गोपाळघरे, प्रकाश गोलेकर, रविराज गायकवाड, मोहन भोसले, बाळासाहेब सुळ, राजेंद्र जाधवर, हनुमंत बारगजे, शाम सकट, दत्तात्रय भोसले, राम शिंदे, प्रल्हाद गिते, मुकुंद गोलेकर, अशोक खटावकर, दिपक जावळे, रामहरी जायभाय, सुहास पाटील, संदिप शिकारे, संदिप बिरंगळ, दत्तराज पवार, हरीदास गोलेकर, गोकुळ गोलेकर, मोहन सुरवसे, संतोष लष्करे, सिताराम जावळे, बब्बू शेख, हनुमंत गोलेकर, धनंजय गोलेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


