ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचा १४ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल प्रयत्नशील:प्रा कैलास माने
जामखेड प्रतिनिधी
ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलचा १४ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक प्रा.कैलास माने तर प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रसिद्ध उद्योगपती संतोष फिरोदिया उपस्थित होते.

यावेळी नगरसेविका वर्षाताई माने, डॉ. अल्ताब शेख, बीड जिल्हा आरोग्य समितीचे डॉ. आबेद जमादार, सागर अंदूरे, कपिल माने आदी मान्यवर पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्ध उद्योगपती संतोष फिरोदिया
बोलताना म्हणाले की,ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूलसारख्या शैक्षणिक संस्थेमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञानच नव्हे तर संस्कार, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाचीही संधी मिळते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. भविष्यातही ही संस्था शिक्षण क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करेल, असा विश्वास आहे.

अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचे संचालक प्राध्यापक कैलास माने यांनी सांगितले की,विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना व व्यक्तिमत्त्व विकासाला वाव मिळावा, यासाठी ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल सातत्याने प्रयत्नशील आहे. वार्षिक स्नेहसंमेलनासारखे कार्यक्रम विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि त्यांच्या अंगी असलेल्या विविध कला सादर करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरतात.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत लोकगीत, हिंदी व मराठी चित्रपटातील गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून पुणे येथील प्रसिद्ध कॉमेडियन अवधूत कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिन्सिपॉल रिया आरोरा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


