गस्त वाढवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे पोलीस निरीक्षकांना निवेदन.

- Advertisement -spot_img

जामखेडमध्ये वाढत्या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गस्त वाढवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून टवाळखोर आणि समाजकंटकांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरसेवक राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले असून, शहरातील संवेदनशील भागांमध्ये तात्काळ पोलीस गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे नागेश्वर मंदिर रोड आणि गुगळे प्लॉटिंग परिसर, नगरपरिषद कार्यालय, सार्वजनिक वाचनालय व नाना-नानी पार्क परिसर, शंकर मूर्ती पाठीमागील रस्ता, लेणीवाडी आणि भुतवडा रोड तसेच विंचरणा नदीकाठचा संपूर्ण परिसर या ठिकाणी समाजकंटकांचा वावर वाढल्याने नागरिकांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सकाळी आणि सायंकाळी व्यायाम किंवा फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना, विशेषतः महिलांना, काही तरुण दुचाकीवरून वेगाने फिरत पाठलाग करून त्रास देत असल्याच्या घटना घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तसेच काही निर्जन स्थळांवर आणि रस्त्याच्या कडेला उघडपणे धूम्रपान, मद्यपान तसेच इतर नशिल्या पदार्थांचे सेवन होत असल्याचेही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. महिलांच्या दागिन्यांची चोरी करण्याचा प्रयत्न होणे, तसेच लहान मुलांसोबत असलेल्या महिलांना त्रास देणे अशा घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय बसस्थानक, खर्डा चौक आणि नागेश विद्यालय परिसरात शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींचा पाठलाग करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर सकाळी ५ ते ८ आणि सायंकाळी ६ ते ९ या वेळेत संबंधित परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी, उघडपणे नशा करणाऱ्यांवर व टवाळखोरी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच संशयास्पद हालचाली करणाऱ्या दुचाकीस्वारांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

जामखेड शहरातील नागरिकांची सुरक्षितता आणि परिसरातील शांतता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा सर्व सामान्य नागरिक व्यक्त करत असून यावेळी शहाजी काका राळेभात, नगरसेवक राजेंद्र गोरे, प्रशांत काका राळेभात, जावेद कुरेशी, इस्माईल भाई सय्यद, अर्चना ताई राळेभात, बिलाल शेख, सचिन शिंदे, प्रदीप शेटे, कुंडल राळेभात, आकाश पिंपळे, बाबासाहेब मगर, संदिप (आण्णा ) गायकवाड, अमोल गिरमे, हरिभाऊ आजबे, दीपक घायतडक, बजरंग डुचे,दत्ता डिसले यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा