जामखेड शहरातील आतिक्रमण हटवण्यासाठी नगरपरिषद सज्ज पण ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे आधिकारी गप्प..
आतिक्रमणा बाबत ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे आधिकारी यांची भुमिका काय? जामखेडकरांना पडला प्रश्न..
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बस स्थानकापासून शासकीय दूध संघापर्यंत दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून अवघा एक किलोमीटरचा रस्ता पार करण्यासाठी नागरिकांना तब्बल दोन तासांचा वेळ लागत आहे.

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ डी या मार्गावरील इतर ठिकाणची अतिक्रमणे हटविण्यात आली असली तरी जामखेड शहरातील अतिक्रमणे मात्र अद्याप कायम आहेत. नगरपरिषद प्रशासन, पोलीस प्रशासन व तहसील प्रशासन अतिक्रमण हटविण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले जात असले तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्याकडून वेळकाढूपणा होत असल्याची चर्चा आहे.सदर महामार्गाची शासकीय हद्द रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस प्रत्येकी १५ मीटर (५० फूट) आहे. या हद्दीतील नियमबाह्य बांधकामे व टपऱ्या प्रस्तावित रस्ते रुंदीकरणास अडथळा ठरत आहेत. परिणामी शहरातील विकासकामे रखडली असून उजनी धरणातून होणारी पाणीपुरवठा योजना देखील ठप्प असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

यापूर्वी बसस्थानक ते खर्डा चौक दरम्यान काही अतिक्रमणे हटविण्यात आली होती; मात्र रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने पुन्हा अतिक्रमणे वाढली. काही ठिकाणी गटारांवर टपऱ्या उभारण्यात आल्या असून काही टपऱ्या भाड्याने दिल्याची माहिती समोर येत आहे. गटाराच्या सुमारे तीन मीटर (१० फूट) जागेत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे नियोजन आहे. बीड रोड परिसरात तर गटारांवर पक्की बांधकामे असल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे केवळ टपरीधारकांवर कारवाई करून मोठ्या बांधकामांकडे दुर्लक्ष होणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

:चौकट :
जामखेड–सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्याबाबत बैठक घेऊन नगरपरिषदेने संबंधितांना सात दिवसांची नोटीस दिली होती. मात्र ठेकेदाराने वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून पुढील कारवाईचे वेळापत्रक कळविण्यात येईल, असे सांगितल्याची माहिती आहे. त्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येणार आहे…
मुख्याधिकारी अजय साळवे
(जामखेड नगरपरिषद)


