जामखेड शहरात गॅसची टंचाई!प्रशासनाने पुरवठा सुरळीत करावा..
फोनला प्रतिसाद नाही, जादा पैसे आकारणी; जामखेड भारत गॅस सेवेमुळे ग्राहक त्रस्त

जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील भारत गॅस केंद्रात ऑनलाईन पद्धतीने नोंदणी होत नसल्याने तसेच गॅस टाकी वितरण करताना जादा पैसे आकारले जात असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे. यामुळे अनेक ग्राहक संतप्त झाले असून तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, गॅस टाकीची अधिकृत किंमत ९२६ रुपये असताना वितरणाच्या वेळी ९६० रुपये घेतले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना नाहक जास्त पैसे मोजावे लागत असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.याशिवाय गॅस कंपनी किंवा गॅस वितरण करणाऱ्या गाडीवरील कर्मचाऱ्यांना फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेक वेळा फोन उचलला जात नसल्याचीही तक्रार ग्राहकांनी केली आहे.

त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत असून गॅस मिळवण्यासाठी त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.दरम्यान, सणासुदीचा काळ सुरू असून गुढीपाडवा व रमजान ईद जवळ आल्यामुळे गॅसची गरज वाढली आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना गॅससाठी त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

चौकट –
बुकिंग नंबर लागत नाही; ग्राहकांनी गॅस बुकिंग करायचे तरी कुणाकडे?
भारत गॅस कंपनीकडून गॅस बुकिंगसाठी देण्यात आलेला अधिकृत मोबाईल क्रमांक अनेक वेळा लावत असूनही लागत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गॅस टाकीचे बुकिंग नेमके कुणाकडे करायचे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. संबंधित क्रमांकावर संपर्क होत नसल्यामुळे ग्राहकांना गॅस बुकिंगसाठी अडचणींचा सामना करावा लागत असून कंपनीने तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.



